बीड : येथील मानवजिगरा सोन्नर यांनी आजपर्यंत तब्बल 100 वेळेस रक्तदान करुन अनोखा विक्रम केला. त्यांच्या रक्तदान दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत

बीड : येथील मानवजिगरा सोन्नर यांनी आजपर्यंत तब्बल 100 वेळेस रक्तदान करुन अनोखा विक्रम केला. त्यांच्या रक्तदान दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विक्रमी रक्तदान करणार्या सोन्नर यांचे जिल्हा रुग्णालय येथे डॉ. जयश्री बांगर यांनी कौतुक करत राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक व गुलाबाचे झाड देवून सन्मानित केले.
यावेळी सत्काराला प्रतिउत्तर देतांना मानवजिगरा सोन्नर यांनी म्हटले की, मी यापुर्वी दि.03 ऑगस्ट 2021 रोजी मरणोत्तर बॉडी ऑर्गन डोनेट करण्याचे लिखित दिले आहे. ज्यामुळे मला माणूस म्हणून समाजासाठी काही केल्याचे सुख जाणवते. खरे पाहिले तर सत्कार्यासाठी शक्तीची नव्हे मानवधर्माची आवश्यकता आहे असे सांगितले.
याविषयी माहिती अशी की, शहरातील मानवजिगरा सोन्नर हे महाविद्यालयीन जीवनापासून स्वईच्छेने रक्तदान करत आले आहेत. कोरोनाच्या महामारीमध्ये लोक भितीपोटी घराबाहेर पडत नव्हते त्यावेळी देखील जिवाची पर्वा न करता लोकसेवेचे व्रत म्हणून मानवजिगरा सोन्नर यांनी सतत रक्तदान करीत राहीले. बालपणापासूनच समाजसेवेची, नृत्याची व अभिनयाची आवड असल्याने गणपती उत्सवात व छोट्या मोठ्या कार्यक्रमातून त्यांनी आपली आवड जोपासली. विविध नृत्य स्पर्धेत 31 मानाची पारितोषिके मिळवून नृत्यामध्ये आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध करुन दाखवले आहे. तसेच बीड फेस्टीव्हलच्या वैयक्तिक नृत्य स्पर्धेत त्यांनी हॅट्रीक मिळविलेली आहे. राज्यात पुणे, संभाजीनगर, लातूर, उजनी, धाराशिव, बीड, कळंब येथे त्यांनी प्रथम क्रमांकांची पारितोषिके मिळविली आहेत.
2005 मध्ये मुंबई येथे पु. ल. देशपांडे महाकरंडक, मराठवाडा लावणी महोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक तर रोटरी क्लब संभाजीनगरच्यावतीने झालेल्या कार्यक्रमात त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवून आपल्या अभिनयाची चमक दाखवून दिली आहे. तसेच सरगम म्युझिकल नाईट सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या ग्रुप, हार्मेनी मेकर्स, सुहाने पल अशा ऑर्केस्ट्रात आपली कला सादर केली आहे. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे लाईव्ह शो करुन त्यांनी रसिकांची मने जिंकली होती. तसेच मार्शल आर्टमध्ये देखील ब्लॅक बेल्ट प्राप्त झाला आहे व युट्युब चॅनलवर अशोका सोन्नर या नावाने चॅनल देखील आहे. या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रत्येक ठिकाणी रक्तदानाचे आवाहन करत असतात. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यासोबतच कला, क्रीडा आणि सामाजिक संदेश देण्याचे कार्य एकत्रितपणे करणारे मानवजिगरा सोन्नर हे खरेच समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहेत. जिल्हा रुग्णालयात मानवजिगरा सोन्नर यांचा सत्कार करताना डॉ. अंजली नाईकवाडे, पल्लवी निकाळजे, संतोष गायकवाड यांची उपस्थिती होती.

COMMENTS