Homeताज्या बातम्या

नांदेड पोलिसांच्या ‘मिशन मुस्कान’ला मोठे यश; अपहरण झालेले ३ महिन्यांचे बाळ अवघ्या २४ तासांत सुखरूप आईच्या कुशीत

नांदेड : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा शोध घेण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे

२४ तासांत तीन खून, एक जीवघेणा हल्ला; नांदेड जिल्ह्यात संतापाचा स्फोट, कायदा-सुव्यवस्थेसमोर नवे आव्हान
पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांची इमानदारी; उद्यानात सापडलेला महागडा मोबाईल मालकाला परत करून जिंकली नागरिकांची मने
नांदेडमध्ये खंजराचा धाक दाखवून १०.५० लाखांची बॅग पळवणारा फरार आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
पुलिस स्टेशन - शिवाजी नगर नांदेड, नांदेड - Justdial

नांदेड : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेल्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याचा शोध घेण्यात पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन मुस्कान’ अंतर्गत अर्धापूर येथील दर्गा परिसरातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, तिच्या ताब्यातून बालकाला सुखरूप सोडवून आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

११ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर हद्दीतून एका अज्ञात महिलेने या निष्पाप बालकाला पळवून नेले होते. मुलाच्या आईने १२ जून रोजी फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी विशेष पथके तयार करून सायबर सेलच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अर्धापूर येथील दर्गा परिसरात छापा टाकून शेख हिना शेख जमार उर्फ चंद्रा प्रभू मोहिते (वय ४०, रा. गौतमनगर, सांगवी) हिला ताब्यात घेतले आणि तिच्या तावडीतून बालकाची सुखरूप सुटका केली.

शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चिमुकल्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या काळजाच्या तुकड्याला पुन्हा कुशीत घेताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय उमेश कदम, इरफान सय्यद, दशरथ पाटील आणि पथकाने केली. २४ तासांत बाळाचा शोध लावून संवेदनशीलतेचे दर्शन घडविणाऱ्या नांदेड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS