नांदेड : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टोळीयुद्धाच्या मालिकेनंतर पोलिसांनी राबविलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर काही प्

नांदेड : दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टोळीयुद्धाच्या मालिकेनंतर पोलिसांनी राबविलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’मुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर काही प्रमाणात अंकुश बसल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, अवघ्या २४ तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेले खून आणि एका जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेने नांदेड जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. किरकोळ वाद, जुन्या भांडणांचा राग आणि संशयातून घडलेल्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, या तिन्ही खून प्रकरणांमध्ये कोणतेही मोठे वैमनस्य किंवा पूर्वनियोजित कट नसून, क्षणिक संताप आणि संशयातून जीव घेण्यापर्यंत मजल गेली आहे.
१. सोनखेडमध्ये किरकोळ वादातून प्लंबरचा खून : लोहा तालुक्यातील सोनखेड येथील मोरगे पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले. प्लंबरचे काम करणारे किफायत अली खाजा मोईनुद्दीन यांच्यासोबत झालेल्या वादानंतर पवन चौधरी (२३) आणि बालाजी मोरे (३६) यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत किफायत अली यांचा मृत्यू झाला.
२. नांदेड शहरात कटरने वार करून हत्या : नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौतम नगर परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून शेजारी राहणार्या सत्यम शंकर जाधव (५८) याने गौतम पुंडलिक गजभारे (२०) याच्यावर धारदार कटरने सपासप वार केले. उपचारादरम्यान गौतमचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
३. मुखेडमध्ये चोरीच्या संशयावरून मारहाण, एकाचा मृत्यू : मुखेड येथील नवा मोंढा भागात गाडीची स्टेप्नी चोरी केल्याच्या संशयावरून खैरका येथील ज्ञानोबा नारायण घुरके (४२) यांना गजानन माणिकराव सादगीर आणि अप्पाराव बालाजी सूर्यवंशी यांनी लाठीकाठ्यांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या ज्ञानोबा घुरके यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
४. देगलूरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला : देगलूर शहरातील हनुमान मंदिर चौकात जुन्या वादातून प्रकाश गज्जलवार याने एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी तरुणावर उपचार सुरू असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या सर्व घटनांची गांभीर्याने दखल घेत जिल्हा पोलीस दलाने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी चारही घटनांमधील एकूण सात आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली आहे. वाढती व्यसनाधीनता आणि असहिष्णुता यामुळे गुन्हेगारी वाढत असून, शांतता राखण्यासाठी सामाजिक पातळीवरही प्रयत्नांची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

COMMENTS