डोंबिवली : स्मार्ट मीटर संदर्भातील गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व वीज ग्राहकांना पटवून देण्यासाठी महावितरणकडून थेट वीज ग्राहकांच्या दारात प्रात्य

डोंबिवली : स्मार्ट मीटर संदर्भातील गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व वीज ग्राहकांना पटवून देण्यासाठी महावितरणकडून थेट वीज ग्राहकांच्या दारात प्रात्यक्षिक दाखवण्यास सुरुवात झाली आहे. महावितरणच्या कल्याण पूर्व विभागात येणाऱ्या कासा गोल्ड आणि कासा रिओ या दोन गृहसंकुलांत रविवारी सुट्टीचे औचित्य साधून सुमारे ५०० वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
कासा रिओ गृहसंकुलाचे पदाधिकारी योगेश पाटील, मनिष मामनिया, कासा गोल्डचे पदाधिकारी समीर कोंढाळकर आणि निवृत्ती पाटील यांनी या कामात पुढाकार घेतला होता.
यावेळी ग्राहकांचे विविध प्रश्न व तक्रारी समजून घेत त्यावर उत्तरे देण्यात आली. स्मार्ट मीटर महाविद्युत ॲपद्वारे रिअल टाईम वीज वापर कसा पाहायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थित ग्राहकांना ॲप इन्स्टॉल करण्यासाठी साहाय्य केले. विविध वीज उपकरणे व त्यांच्या वीज वापराबाबत माहिती देण्यात आली.
तथापि, ग्राहकांनी स्मार्ट मीटरबद्दल वीज वापराच्या फरकाबाबतची शंका दूर करण्यासाठी तक्रारीनुसार मीटर चाचणी करण्याची मागणी केली. ग्राहकांच्या मागणीनुसार सिरिज मीटरद्वारे मीटर तपासणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीला महावितरणचे देयके आणि महसूल विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर, सहाय्यक अभियंता गणेश वग्रे यांच्यासह संचलन व सुव्यवस्था तसेच देयक व महसूल उपविभागातील लिपिक व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS