देवळाली प्रवरा : नगरपरिषद निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या राजकीय वैमनस्यातून एका तरुणावर सत्तूर व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक

देवळाली प्रवरा : नगरपरिषद निवडणुकीदरम्यान निर्माण झालेल्या राजकीय वैमनस्यातून एका तरुणावर सत्तूर व लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर केडगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत सागर ज्ञानदेव गडाख (रा. देवळाली प्रवरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते भाजपचा प्रचार करत होते, तर किरण उत्तम पठारे हा काँग्रेस पक्षाचा प्रचार करत होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता.
फिर्यादीनुसार, २३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजता गावात सुरू असलेल्या भांडणाच्या ठिकाणी किरण पठारे आला व कोणतेही कारण नसताना गडाख यांना शिवीगाळ करत “तुला जिवे ठार मारीन” अशी धमकी दिली. मात्र, गडाख यांनी त्या वेळी हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता.
त्यानंतर २४ मार्च रोजी सकाळी सुमारे दहा वाजता गडाख हे पत्नीला छत्रपती शाहू महाराज कॉलेज येथे सोडून परत येत असताना सोसायटी पेट्रोल पंपाजवळ किरण पठारे चारचाकी वाहनात दिसला. त्याकडे दुर्लक्ष करून ते पुढे गेले. हॉटेल स्वराज परिसरात मित्र कृष्णा जाधव चहा घेत असल्याने गडाख तेथे थांबले.
दरम्यान, किरण पठारे व त्याचा साथीदार युवराज चांगदेव तनपुरे (रा. राहुरी) हे तेथे आले. पठारे याच्या हातात लोखंडी सत्तूर, तर तनपुरे याच्या हातात लोखंडी रॉड होता. “तू आमच्या विरोधात प्रचार करतोस,” असे म्हणत दोघांनी गडाख यांच्यावर हल्ला चढवला. सत्तूरने डोक्यावर वार करण्यात आला, तर लोखंडी रॉडने डोक्यावर व कानामागे मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गडाख गंभीर जखमी झाले.
जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी केडगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
या प्रकरणी सागर गडाख यांच्या फिर्यादीवरून किरण उत्तम पठारे (रा. देवळाली प्रवरा) व युवराज चांगदेव तनपुरे (रा. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास वेगाने सुरू केला असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व आवश्यक नमुने संकलित केल्याची माहिती मिळाली आहे.


COMMENTS