मुंबई : नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणाने राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. अटकेची चाहूल लागताच खरातने शिर्डी येथे काह

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणाने राज्यातील सामाजिक व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. अटकेची चाहूल लागताच खरातने शिर्डी येथे काही वरिष्ठ सनदी अधिकार्यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा पुढे आला असून, या भेटीमागील हेतू काय होता, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचवेळी, तथाकथित धार्मिक विधींच्या आड महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक आरोपही समोर आले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, अटकेपूर्वी काही दिवस आधी शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये खरातची तीन सनदी अधिकार्यांशी बैठक झाली होती. ही भेट एका स्थानिक व्यक्तीने घडवून आणल्याचे सांगितले जाते. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, अटकेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पुढील हालचालींबाबत काही रणनीती आखली का, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी या घडामोडींनी प्रकरण अधिकच गडद झाले आहे. खरातच्या कार्यपद्धतीबाबत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे. स्वतःला दैवी शक्ती प्राप्त असल्याचे भासवून तो महिलांना ‘शुद्धीकरण’ आवश्यक असल्याचे सांगत असे. या प्रक्रियेतून त्यांच्या आयुष्यात सुधारणा होईल, असा विश्वास निर्माण करून त्यांच्यावर अमानुष वर्तन केल्याचे आरोप आहेत. काही पीडित महिलांचा शैक्षणिक व सामाजिक स्तर उच्च असल्याची बाब या प्रकरणातील गुंतागुंत अधोरेखित करते. फक्त महिलांचे शोषणच नव्हे, तर आर्थिक फसवणुकीचेही प्रकार उघड झाले आहेत. अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मार्गदर्शनाच्या नावाखाली खोटी रत्ने विकणे, संबंध प्रस्थापित करून त्यातून आर्थिक लाभ मिळवणे, अशा विविध पद्धतींनी मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचे आरोप आहेत. एका उद्योजकाकडून कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी केल्याची माहितीही समोर आली आहे
या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांच्या आड सुरू असलेल्या भोंदूपणाच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अंधश्रद्धा, भीती आणि व्यक्तिगत अडचणींचा गैरफायदा घेत अशा व्यक्ती समाजात प्रभाव निर्माण करतात, ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे अशा प्रकरणांकडे केवळ गुन्हेगारी म्हणून नव्हे, तर व्यापक सामाजिक समस्या म्हणून पाहण्याची गरज अधोरेखित होत आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा सर्वंकष तपास सुरू केला असून, कथित बैठकीतील अधिकार्यांची भूमिकाही तपासली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पीडितांना न्याय मिळवून देणे आणि अशा प्रकारच्या भोंदूपणावर कठोर कारवाई करणे, ही यंत्रणांसमोरील मोठी जबाबदारी ठरणार आहे.

खरातला कॅप्टन म्हणू नका : संभाजीराजे
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. अशोक खरात हा देशाच्या सैन्य दलात किंवा नौदलात नव्हता. त्यामुळे त्याच्या नावापुढे कॅप्टन लावू नका, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे. त्याच्या या दुष्कृत्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत. त्यामुळे त्याचा कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.


COMMENTS