दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या दमदार पावसामुळे माहूर तालुक्यातील वझरा (शेख फरीद) येथील निसर्गरम्य धबधबा पुन्हा एकदा दिमाखात कोसळू लागला आ

दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या दमदार पावसामुळे माहूर तालुक्यातील वझरा (शेख फरीद) येथील निसर्गरम्य धबधबा पुन्हा एकदा दिमाखात कोसळू लागला आहे. फेसाळत कोसळणारा धबधबा, हिरवाईने नटलेला परिसर आणि हजरत शेख फरीद बाबा दर्ग्याचे धार्मिक महत्त्व यामुळे पर्यटक व भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत कोणत्याही ठोस सुरक्षा उपाययोजना नसल्याने संभाव्य दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागला असून परिसरातील निसर्गसौंदर्य खुलून आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून अपुर्या पावसामुळे हे मनमोहक दृश्य क्वचितच पाहायला मिळत होते. गतवर्षीही धबधबा अवघे काही दिवस सुरू राहिला होता. यंदा मात्र दमदार पावसानंतर धबधब्याचे रौद्र आणि मोहक रूप पाहण्यासाठी पर्यटकांची अक्षरशः रीघ लागली आहे. मराठवाडा, विदर्भ तसेच शेजारच्या तेलंगणातूनही पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. अनेक कुटुंबे आणि युवक निसर्गाचा आनंद लुटत असताना काही जण धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा जीवघेणा मोह आवरत नसल्याचे चित्र दिसत आहे. धबधब्याच्या खोल कुंडाजवळ आणि घसरड्या खडकांवर जाऊन फोटो काढण्याचे प्रकार वाढल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी परिसरात पोलिस बंदोबस्त, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, धोक्याच्या ठिकाणी इशारा फलक, संरक्षक कठडे तसेच प्रवेश नियंत्रणाची व्यवस्था तातडीने करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून होत आहे. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रतिबंधात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, वझरा धबधबा परिसरात मूलभूत पर्यटन सुविधांचाही अभाव आहे. वन विभागाने या परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून नियोजनबद्ध विकास केल्यास वन उद्यान, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वाहनतळ, सुरक्षित पाहणी स्थळे आणि माहिती केंद्र उभारता येईल. त्यामुळे पर्यटकांना अधिक सुविधा मिळण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. निसर्गाची मुक्त उधळण अनुभवण्यासाठी दररोज हजारो पर्यटक वझरा धबधब्याकडे आकर्षित होत असताना, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वीच आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवून या पर्यटनस्थळाचा सुरक्षित आणि शाश्वत विकास करावा, अशी एकमुखी मागणी नागरिक, पर्यटक आणि भाविकांकडून होत आहे.

COMMENTS