मुंबई : मुंबईतील सर्वसामान्यांसाठी जीवनरेखा मानले जाणारे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (केईएम) रुग्णालय पुन्हा एकदा नामांतराच्या वादात सापडले आहे

मुंबई : मुंबईतील सर्वसामान्यांसाठी जीवनरेखा मानले जाणारे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय (केईएम) रुग्णालय पुन्हा एकदा नामांतराच्या वादात सापडले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या रुग्णालयाचे नाव बदलण्याबाबत मुंबई महापालिकेला अधिकृत पत्र पाठवले असून, या मागणीमुळे वैद्यकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
लोढा यांनी यापूर्वीही जानेवारी महिन्यात केईएम रुग्णालयातील एका कार्यक्रमात नाव बदलण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यानंतर आता पुन्हा अधिकृत पत्राद्वारे त्यांनी या प्रक्रियेला गती देण्याची मागणी केली आहे. ब्रिटिशकालीन ओळख दर्शवणारे ‘केईएम’ हे नाव बदलून भारतीय संस्कृतीशी सुसंगत नाव द्यावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. लोढा यांनी रुग्णालयाचे नाव ‘कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय’ असे ठेवण्याची शिफारस केली आहे. या नावामुळे ‘केईएम’ ही संक्षिप्त ओळख तांत्रिकदृष्ट्या कायम राहू शकते, असा दावाही त्यांनी केला आहे. केईएम रुग्णालय ही केवळ वैद्यकीय सेवा देणारी संस्था नसून मुंबईची जागतिक ओळख मानली जाते. त्यामुळे यापूर्वी लोढा यांनी ही मागणी मांडल्यानंतर राजकीय तसेच आरोग्य क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता पुन्हा पत्राद्वारे हा मुद्दा पुढे आल्याने मुंबई महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. रुग्णालय महापालिकेच्या अखत्यारीत असल्याने प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS