छ. संभाजीनगर : राज्यात वाढत्या रेव्ह पार्ट्यांमुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अ

छ. संभाजीनगर : राज्यात वाढत्या रेव्ह पार्ट्यांमुळे तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणार्यांवर संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. समाजाला घातक ठरणार्या या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक प्रभावी पावले उचलावीत, असे ते म्हणाले.
पत्रकारांशी संवाद साधताना शिरसाट यांनी कथित धर्मांतराशी संबंधित निदा खान प्रकरणाचाही उल्लेख केला. हे प्रकरण केवळ एका शहरापुरते मर्यादित नसून त्याची व्यापक चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्तींवर निष्पक्ष कारवाई झाल्यासच संपूर्ण सत्य समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले. कंत्राटी कामांच्या गुणवत्तेबाबत बोलताना शिरसाट यांनी काही ठिकाणी मूळ कंत्राटदारांकडून कामे पुढे इतरांकडे सोपविली जात असल्याने दर्जावर परिणाम होत असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली असून संबंधित यंत्रणांकडून आवश्यक कारवाई होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमतींबाबत बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम ऊर्जा क्षेत्रावर होत असल्याचे सांगितले. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे इंधन दरांवर दबाव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विरोधकांकडून निवडणूक प्रक्रियेवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असल्याबाबत शिरसाट यांनी टीका केली. निवडणुकांतील पराभवानंतर मतदान यंत्रांवर आरोप करण्याऐवजी संघटनात्मक कमतरता आणि अंतर्गत मतभेद यांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेविषयीचे विविध आक्षेप न्यायालयीन आणि निवडणूक आयोगाच्या स्तरावर तपासले गेले आहेत. त्यामुळे त्याच मुद्द्यांची पुनरावृत्ती करून जनतेत संभ्रम निर्माण करण्याऐवजी राजकीय पक्षांनी स्वतःच्या संघटनात्मक उणिवांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रशासकीय अधिकार्यांच्या भूमिकेबाबत भाष्य करताना शिरसाट यांनी अधिकारी वर्गाने आपल्या जबाबदार्यांच्या चौकटीत राहून काम करावे, असे सांगितले. कोणत्याही प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपाला किंवा पक्षपाती वर्तनाला वाव देता कामा नये. अशा तक्रारी आल्यास त्या राज्य सरकारसमोर मांडल्या जातील आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
खा. सुळेंच्या आरोपांचा घेतला समाचार
विधानपरिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याचा खा. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा मंत्री संजय शिरसाट यांनी समाचार घेतला. तसेच त्यांनी आर्थिक व्यवहारांशी संबंधित आरोपांबाबत बोलताना शिरसाट यांनी, कोणाकडे ठोस पुरावे असतील तर ते सार्वजनिक करावेत, अशी भूमिका मांडली. केवळ आरोप-प्रत्यारोपांमुळे जनतेचा विश्वास बसत नाही. त्यामुळे वस्तुनिष्ठ माहिती आणि पुराव्यांच्या आधारेच आरोप मांडले जावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS