नवी दिल्ली : तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या तसेच तेथे जाण्याची तयारी करणार्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सुरक्

नवी दिल्ली : तेहरानमधील भारतीय दूतावासाने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या तसेच तेथे जाण्याची तयारी करणार्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण सुरक्षा सूचना जारी केली आहे. इराणमधील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, नागरिकांनी पुढील आदेश येईपर्यंत अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन दूतावासाने केले आहे.
दूतावासाच्या माहितीनुसार, अलीकडील काळात इराणमधील सुरक्षेच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, कोणताही धोका पत्करणे योग्य ठरणार नसल्याने यापूर्वी जारी केलेल्या सुरक्षा सूचना अद्याप कायम ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कारणांशिवाय इराणला जाणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या इराणमध्ये राहणार्या भारतीयांनी अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी परिसरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे, विश्वासार्ह वृत्तमाध्यमांमधूनच माहिती घ्यावी आणि स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे व सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे दूतावासाने म्हटले आहे. याशिवाय, इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या तसेच नव्याने तेथे पोहोचणार्या सर्व भारतीयांनी तेहरानस्थित भारतीय दूतावासात आपली नोंदणी तातडीने करून घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत व संपर्क सुलभ व्हावा, हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. नवीन सुरक्षा सूचना, प्रवासविषयक सल्ले आणि इतर महत्त्वपूर्ण अद्ययावत माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी दूतावासाच्या अधिकृत संकेतस्थळासह समाजमाध्यमांवरील अधिकृत खात्यांवर नियमितपणे लक्ष ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन मदतीसाठी भारतीय दूतावासाने विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले असून, गरज भासल्यास भारतीय नागरिकांनी त्यांचा वापर करावा, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक :
- +98 912 810 9115
- +98 912 810 9109
- +98 912 810 9102
- +98 993 217 9359

COMMENTS