मिरजगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती मिरजगाव येथे नुकतीच उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आ

मिरजगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती मिरजगाव येथे नुकतीच उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते.
शाहूनगर येथील बौद्धविहारातून प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची आकर्षक रथातून मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत काढण्यात आली. पांढरे शुभ्र वस्त्र व गळ्यात निळा पंचा परिधान केलेले भीम अनुयायी, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमले होते. मिरवणूक शांततामय वातावरणात पार पडली. मुंजोबा चौक येथील मुंजोबा मित्र मंडळाने थंडगार शरबताचे वाटप केले, तर क्रांती चौक येथे तरुण मंडळाच्या वतीने ज्यूस बॉटलचे वाटप करण्यात आले.
मिरवणुकीची सांगता मुख्य क्रांती चौकात करण्यात आली. येथे उभारलेल्या भव्य व्यासपीठावर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदना व पंचशील घेण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, मिरजगाव यांच्या वतीने उत्कृष्ट व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते.

COMMENTS