पंढरपूर/मुंबई : शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक कर्जमाफीची अंमलबजावणी करावी तसेच कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी पंढरपुरात सु
पंढरपूर/मुंबई : शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक कर्जमाफीची अंमलबजावणी करावी तसेच कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द कराव्यात, या मागण्यांसाठी पंढरपुरात सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग’ आंदोलन अखेर तिसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मध्यस्थी केली. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांसोबत विशेष बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला राज्यातील विविध शेतकरी संघटना, वारकरी संप्रदायातील प्रतिनिधी तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात यश आल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
आंदोलन मागे घेतल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, “शेतकरी कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले असले, तरी त्यातील जाचक अटींमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. शासनाने सुरुवातीला या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाहिले नव्हते, मात्र आता अटींमध्ये बदल करण्याची तयारी दर्शविल्याने आंदोलनाला यश आले आहे.” आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी पंढरपुरात जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानुसार २२ जूनपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन दिले.

COMMENTS