Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जे बोलतो ते करतो; आरोग्य व शिक्षणासाठी माझी बांधिलकी कायम-खा.डॉ. गोपछडे

नांदेड : महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यां

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘शिवा’ची भव्य मिरवणूक; विचारमंथनातून समाजप्रबोधन
14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन
बसवेश्वर जयंतीच्या बॅनरमधून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर ; परशुराम जयंतीकडे मात्र काही नेत्यांचा कानाडोळा ?

नांदेड : महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना चांगले वातावरण, आधुनिक साधने आणि मूलभूत सुविधा मिळाल्यास ते निश्चितपणे मोठी झेप घेऊ शकतात. याच भावनेतून महानगरपालिका शाळांसाठी विविध उपक्रम राबविले जात असून शिक्षण क्षेत्रासाठी माझी बांधिलकी कायम राहील, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार  डॉ. अजित गोपछडे यांनी केले.
महानगरपालिका शाळांना सीएसआर निधीतून आधुनिक डेस्क-बेंच, शालेय साहित्य व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक, नागरिक तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला महापौर कविता  मुळे, उपमहापौर दीपकसिंग रावत, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चैतन्यबापू देशमुख, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र सिंघ गाडीवाले, महिला बालकल्याण व शिक्षण सभापती सदिच्छा सोनी- पाटील, उपसभापती निरंजना लांडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, यांच्यासह विविध पक्षाचे नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी, मनपा शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. नांदेडच्या जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी व विकासाच्या माध्यमातून पुण्य वाटून घेण्यासाठी नगरसेवकांनी आरोग्य व शिक्षणाच्या समस्या माझ्याकडे मांडाव्यात. त्या सोडविण्यासाठी मी मदत करेल. शहरामध्ये अत्याधुनिक व सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल व कॅन्सर टेस्टिंग लॅब ऑन व्हील निर्माण करण्यासाठी महापालिकेने जागा द्यावी अशी सूचना खासदार डॉ. गोपछडे यांनी यावेळी केली. आपल्या भाषणात ते म्हणाले की, निवडणूक प्रचाराच्या काळात शहरातील अनेक शाळांना भेटी दिल्या असता शिक्षण क्षेत्रातील काही गंभीर कमतरता जाणवल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा नव्हत्या. काही शाळांमध्ये बसण्याची व्यवस्था अपुरी होती, तर काही ठिकाणी मूलभूत सोयींची गरज होती. त्या वेळी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ठोस आणि दीर्घकालीन काम करण्याचा संकल्प केला होता. आज त्या संकल्पपूर्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकल्याचा आनंद होत आहे. ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देऊन चालत नाही, तर त्यांना सुसज्ज वातावरण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चांगली बाके, स्वच्छ वर्गखोल्या, प्रयोगशाळा, क्रीडा सुविधा आणि शुद्ध पिण्याचे पाणी या सुविधा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहेत. महानगरपालिका शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनाही खाजगी शाळांप्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजेत, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  यावेळी त्यांनी आपल्या पूर्वीच्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत जिल्हा परिषदांच्या 94 शाळांना ओपन जिम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव वाढली असून शाळेकडे आकर्षणही निर्माण झाले आहे. शिक्षणासोबत आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वास यांचाही विकास व्हावा, हा या योजनेमागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात त्यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. महानगरपालिकेच्या 15 शाळांमध्ये लवकरच स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या दिवसांत विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि शाळांमध्ये स्वच्छतेची पातळी उंचवावी, यासाठी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणातील आपल्या कार्यशैलीबाबत बोलताना खासदार डॉ.  गोपछडे म्हणाले, मी राजकारणात असलो तरी जे बोलतो ते करतो, आणि जसे बोलतो तसेच वागतो. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आश्वासने देणे नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून विश्वास जिंकणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी अभ्यासासोबत विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि संस्कार यांनाही तितकेच महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्या दिशेने मेहनत घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी नव्या डेस्क-बेंचबद्दल आनंद व्यक्त केला. आधुनिक फर्निचरमुळे बसण्याची उत्तम व्यवस्था झाली असून आता अधिक लक्षपूर्वक अभ्यास करता येईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. शिक्षकांनीही या उपक्रमाचे स्वागत करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अशा सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले. या उपक्रमामुळे महानगरपालिका शाळांकडे पालकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार असून आगामी काळात आणखी शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. खासदार यांच्या पुढाकारामुळे महानगरपालिका शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा मिळत असल्याची भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

COMMENTS