Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भव्य सोहळ्यात आज हेडगेवार स्मृतीस्थळाचे लोकार्पण

धर्माबादपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील कंदकुर्ती येथे केशव हेडगेवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या भव्य दोन मजल

कुंडलवाडी पोलिसांची तत्पर कारवाई; नियोजित बालविवाह रोखण्यात यश
विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखून ध्येय ठरवावे-प्रियंका पवार
तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे



धर्माबादपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणातील कंदकुर्ती येथे केशव हेडगेवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या भव्य दोन मजली स्मृतीस्थळाचे लोकार्पण आज, दि. 11 एप्रिल रोजी होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असून, परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.लोकार्पण सोहळ्यानिमित्त सायंकाळी 5.30 वाजता भागवत यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता ते उपस्थित स्वयंसेवक व नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी संघाचे सुमारे 3 हजार स्वयंसेवक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून, त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्थेतही आवश्यक त्या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, कंदकुर्ती परिसरात स्वच्छता, सजावट आणि पायाभूत सुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दूरवरून येणार्‍या नागरिकांसाठी पार्किंग, पिण्याच्या पाण्याची सोय तसेच मार्गदर्शक फलक लावण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी शिस्तबद्ध नियोजनासाठी स्वयंसेवकांची स्वतंत्र पथके कार्यरत राहणार आहेत. सदर स्मृतीस्थळाचे बांधकाम डिसेंबर 2023 मध्ये सुरू झाले होते. सुमारे 1080 चौरस यार्ड क्षेत्रावर उभारण्यात आलेले हे स्मारक वास्तुशिल्पदृष्ट्या आकर्षक असून, राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे ठरणार आहे. खालच्या मजल्यावर हेडगेवार यांची सुमारे 6 फूट उंचीची भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. तर वरच्या मजल्यावर भारत मातेची मूर्ती, तसेच त्यांच्या जन्मापासून ते अखेरच्या काळापर्यंतच्या जीवनप्रवासाचे छायाचित्रमय प्रदर्शन साकारण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या विचारांवर आधारित साहित्य, ग्रंथ आणि दस्तऐवजही येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  स्मृतीस्थळाचे व्यवस्थापक गोविंदराव देवला यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकार्पणानंतरही काही अंतर्गत कामे पुढील सहा महिन्यांपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच येत्या दसरा सणापर्यंत केशव हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या भव्य स्मृतीस्थळामुळे कंदकुर्ती हे ठिकाण ऐतिहासिक व प्रेरणादायी केंद्र म्हणून विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच देशभरातून येणार्‍या नागरिकांसाठी हे एक महत्त्वाचे प्रेरणास्थान ठरणार असल्याचे मतही व्यक्त होत आहे.

COMMENTS