Homeताज्या बातम्या

गोदावरीत रेती माफियांविरोधात कारवाई; 3.64 कोटींचा मुद्देमाल जप्त211 तराफे, 15 बोटी, 15 इंजिने जागेवरच नष्ट; सहा जणांसह अन्य आरोपींवर गुन्हा

नांदेड : गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करत रेती माफियांचे

अवैध रेती वाहतुकीवर भाग्यनगर पोलिसांची कारवाई; टिप्परसह 5.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकार्‍यांकडे;महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
शेवगावात अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईस्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त


नांदेड : गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई करत रेती माफियांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पोलिसांनी छापेमारी करून तब्बल 3 कोटी 64 लाख 45 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, रेती उपशासाठी वापरण्यात येणारे 211 तराफे, 15 लोखंडी बोटी, 15 इंजिने आणि 260 ब्रास रेती ताब्यात घेतली आहे. पर्यावरणाची पुढील हानी टाळण्यासाठी तराफे, बोटी आणि इंजिने घटनास्थळीच नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन करणार्‍या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष मोहीम सुरू केली असून त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. 30 जुलै रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी ओमकांत चिंचोलकर यांना आसर्जन ते मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रेती उत्खनन सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष नियोजनबद्ध छापा टाकला. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचताच रेती माफियांची एकच धावपळ उडाली आणि अनेक जण अंधाराचा व नदीपात्राचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले.
कारवाईदरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर रेती उपशासाठी वापरले जाणारे 211 तराफे, 15 लोखंडी बोटी, 15 इंजिने, 260 ब्रास रेती तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची किंमत 3 कोटी 64 लाख 45 हजार 800 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवैध उत्खनन पुन्हा सुरू होऊ नये आणि नदीपात्रातील पर्यावरणाची आणखी हानी टाळण्यासाठी जप्त करण्यात आलेले तराफे, बोटी आणि इंजिने जागेवरच नष्ट करण्यात आली.
या प्रकरणी नारायण पुंड, विठ्ठल डक, गोविंद डक, सचिन क्षीरसागर, गंगाधर मेथेवाड आणि चंद्रकांत लाकडे यांच्यासह अन्य पाच ते सहा अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्यानुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून, अवैध रेती उत्खननाच्या संपूर्ण साखळीचा तपासही पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट कुसमे, बापुराव चव्हाण आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान करणार्‍या तसेच पर्यावरणाची हानी करणार्‍या रेती माफियांविरुद्ध यापुढेही अशाच धडक आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट इशारा नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील रेती माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या पुढील कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

COMMENTS