शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत असून मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलन, रस्ते खचणे

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत असून मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूस्खलन, रस्ते खचणे आणि वीजपुरवठा खंडित होणे यामुळे नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यातील तब्बल 145 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले असून 224 वीज रोहित्रे बंद पडली आहेत. अनेक भागांतील पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. गेल्या दीड महिन्यात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये 142 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 800 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील काही दिवसही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्य आपत्कालीन संचालन केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राज्यातील 145 रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. त्यामध्ये मंडी जिल्ह्यात सर्वाधिक 66 रस्ते बंद असून कुल्लू जिल्ह्यात 31 आणि सिरमौर जिल्ह्यात 28 रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक भागांत डोंगर उतार कोसळल्याने रस्ते माती आणि दगडांच्या ढिगार्याखाली गेले आहेत. पावसामुळे वीजपुरवठ्यालाही मोठा फटका बसला आहे. राज्यातील 224 वीज रोहित्रे बंद पडली असून त्यापैकी 182 रोहित्रे एकट्या मंडी जिल्ह्यातील आहेत. तसेच 14 पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्याने अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. हवामान केंद्राच्या नोंदीनुसार, धर्मशाळा येथे 79 मिलीमीटर, जोगिंदरनगर येथे 76 मिलीमीटर, मंडी येथे 63.4 मिलीमीटर, तर शिमला येथे 54.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या सततच्या पावसामुळे नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या एकत्रित मान्सून नुकसान अहवालानुसार, 30 जून ते 6 ऑगस्ट या कालावधीत पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये 142 जणांचा मृत्यू झाला असून 224 जण जखमी झाले आहेत. सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तेचे मिळून सुमारे 797.86 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसही हिमाचल प्रदेशात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 10 आणि 11 ऑगस्टसाठी राज्यातील विविध भागांत अतिमुसळधार पावसाचा नारिंगी इशारा तसेच मुसळधार पावसाचा यलो इशारा जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांनी नदी, नाले व ओढ्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच अत्यावश्यक कारण नसल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. सततच्या पावसामुळे परिस्थितीवर राज्य प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून बचाव आणि मदतकार्यही वेगाने सुरू आहे.

COMMENTS