हमारी माँगे पुरी करो…कष्टकर्‍यांचा घुमला आवाज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हमारी माँगे पुरी करो…कष्टकर्‍यांचा घुमला आवाज

देशव्यापी संपाला नगरमध्ये प्रतिसाद, वीजपुरवठा काही ठिकाणी खंडीत

अहमदनगर/प्रतिनिधी : हमारी माँगे पुरी करो…इन्कलाब जिंदाबाद…कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही…अशा अनेकविध घोषणांचा आवाज सोमवारी (28 मार्च

विहिरीचे काम करत असताना परप्रांतीय पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
टाकळीच्या अवलियाचा वैष्णोदेवीला मोटरसायकलवर प्रवास

अहमदनगर/प्रतिनिधी : हमारी माँगे पुरी करो…इन्कलाब जिंदाबाद…कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही…अशा अनेकविध घोषणांचा आवाज सोमवारी (28 मार्च) नगरमध्ये घुमला. कष्टकरी व कामगार संघटनांसह बँक कर्मचारी, मनपा कर्मचारी, वीज कर्मचार्‍यांसह विविध क्षेत्रातील कामगारांच्या दोन दिवशीय देशव्यापी संपाचा पहिला दिवस आंदोलनांनी गाजला. दरम्यान, महावितरणचे कर्मचारीही संपावर असल्याने नगर शहरात तीन-चार ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. त्याच्या दुरुस्तीसाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने महावितरणच्या अधिकार्‍यांची धावपळ झाली.
केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेले 4 कोड बील रद्द करावे व खासगीकरण थांबविण्याच्या प्रमुख मागणीसाठी कामगार व कष्टकर्‍यांच्या सुमारे 22 मागण्यांसाठी देशातील प्रमुख व विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी दोन दिवसीय संप पुकारला आहे. मंगळवारीही (29 मार्च) हा संप सुरू राहणार आहे. ऐन मार्चएंडच्या काळात होत असलेल्या या संपामुळे बँकींग व्यवहार ठप्प झाले आहेत. एटीएम व ऑनलाईन व्यवहार सुरू असले तरी चेक क्लिअरन्सचे काम मात्र बंद झाले आहे.

पत्रकार चौकात निदर्शने
अहमदनगर जिल्हा आयटक व लालबावटा विडी कामगार युनियन संयुक्त कृती समितीच्यावतीने देशव्यापी संपाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी नगर-मनमाड महामार्गावरील पत्रकार चौकात कामगारांनी निदर्शने केली. शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करुन धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आयटकचे जिल्हा सचिव अ‍ॅड. सुधीर टोकेकर, महाराष्ट्र राज्य विडी फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कारभारी उगले, विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्ष भारती न्याल्पेल्ली, आशा संघटनेच्या रुपाली बनसोडे, संजय कांबळे, सिटूचे महादेव पालवे, एमएसईबीचे गोकुळ बिडवे, अवतार मेहरबाबा ट्रस्ट कामगार युनिटचे अध्यक्ष सतीश पवार, मोलकरीण संघटनाचे कमलेश सपरा, प्रदीप नारंग, भुजबळ, आशा कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा थोरात, महापालिका आशा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा स्वाती भणगे, इंटकचे विनायक मच्चा, कविता मच्चा, विजय भोसले, महादेव पालवे, संतोष बत्तीन आदी सहभागी झाले होते. या आंदोलनात लालबावटा विडी कामगार युनियन, आयटक कामगार संघटना, इंटक विडी कामगार संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, लालबावटा जनरल कामगार युनियन, घरेलू मोलकरीण व घरगडी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, पतसंस्था कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या.

जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन
केंद्र सरकारच्या कामगार व जनविरोधी धोरणाच्या विरोधात तसेच अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारात अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी सोमवारी धरणे आंदोलन केले. अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका-मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र बावके, अध्यक्षा मदिना शेख, सहचिटणीस जीवन सुरुडे, मायाताई जाजू, रतन गोरे, अलका दरंदले, इंदुबाई दुशिंग, संगिता विश्‍वासराव, मनिषा जाधव, रागिनी जाधव, मन्नाबी शेख, मंदा कासार, मंदा निकम, मुक्ता हासे, मिना घाकतोडे, चंद्रकला विटेकर, शोभा विसपुते, अलका नगरे आदींसह अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडी कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, तोपर्यंत भरीव वेतन वाढ द्यावी, दरमहा पेन्शन, नवीन मोबाईल, मराठी पोषण ट्रॅकर अ‍ॅप आणि लाभार्थ्यांना पूरक पोषण आहार, मिनी अंगणवाडी कर्मचार्‍यांचे प्रश्‍नांच्या सोडवणुकीची मागणी यावेळी करण्यात आली.

वीज कर्मचार्‍यांकडून निषेध
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती,29 संघटनांचा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या धोरणा विरोधात सोमवारी संप करण्यात आला. मागील दोन महिन्यांपासून वीज कर्मचारी मागण्या मांडत असताना राज्य सरकारकडून त्या सोडवण्याची कोणतीही कार्यवाही होत नसल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. यावेळी धीरज गायकवाड (पदाधिकारी,अभियंता संघटना), सतीश भुजबख (स्वाभिमानी तांत्रिक पदाधिकारी),राजेंद्र घोरपडे (वर्कर फेडरेशन पदाधिकारी) आदीसह वीज अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपन्यात सुरु करण्यात येत असलेले खाजगीकरण रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

बँक कर्मचार्‍यांची घोषणाबाजी
दोन दिवशीय संपात बँक कर्मचारीही सहभागी झाले असून, सोमवारी अहमदनगर शहरात यूको बँक चितळे रोड येथे सर्व कर्मचारी व अधिकार्‍यांची सभा व निदर्शने झाली. यावेळी सरकारच्या विरोधात व मागण्यांसंदर्भात तसेच कामगार एकजुटीच्या घोषणा देण्यात आल्या.
बँक कर्मचारी व अधिकार्‍यांच्या संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत झाल्याचा दावा यावेळी करण्यात आला. या आंदोलनात कांतीलाल वर्मा, माणिक अडाणे, उल्हास देसाई, सुजय नळे, अमोल बर्वे यांनी मार्गदर्शन केले. मोईन शेख, प्रवीण मेहेत्रे, सुनील गोंडके, सुशील, सायली शिंदे, प्रकाश कोटा, विजेंद्र सिंग, अजित बर्डे, गोरख चौधरी, सचिन बोठे, कीर्ती जोशी, संदीप शिरोडे, खामकर उपस्थित होते. उमाकांत कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. सरकार देशातील अस्तित्वात असलेल्या कामगार कायद्यांच्या जागी नवीन कामगार कोड आणीत असून त्यामुळे कामगारांच्या हक्कावर गदा येणार आहे, असा दावा यावेळी करण्यात आला. आंदोलनानंतर संघटनेचे पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान आज दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सावेडीतील प्रोफेसर चौक येथे युनियन बँक ऑफ इंडियासमोर सभा व निदर्शने होणार आहेत.

भिंगारच्या महावितरण कार्यालयाला चपलेचा हार
दोन दिवशीय देशव्यापी संपात महावितरणचे कर्मचारी सहभागी झाल्याने वीज पुरवठा अनेक ठिकाणी विस्कळीत झाला. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवकच्यावतीने भिंगार महावितरण कार्यालयाला चपलेचा हार घालण्यात आला. भिंगार शहराची रात्रीपासून बत्ती गुल झाली असून, भिंगार शहराची लवकरात लवकर लाईट आली नाही तर अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांनी दिला आहे. या आंदोलनात नंदू परदेशी, नईम शेख, इब्राहिम शेख, असिफ शेख, हनिफ शेख, इस्माईल शेख, लुनिया, शिंदे, तोडमल, समीर शेख, परदेशी, अंजुम सय्यद, अस्लम शेख आदी नागरिक सहभागी झाले होते. वीजपुरवठा बंद असल्याचे अधिकार्‍यांना सांगून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही व महावितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी हे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने तसेच सध्या 10 वी व 12 वीचे पेपर चालू असून व उन्हाळा जाणवत असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. महावितरण कर्मचार्‍यांनी लाईटची व्यवस्था करून देऊन लाईट चालू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS