कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव येथे विद्यार्थ्यांची वाढती संख्या तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमा

कोपरगाव : रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव येथे विद्यार्थ्यांची वाढती संख्या तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या सध्या सुरू असलेल्या २० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या इमारतीवर १० हजार स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा दुसरा मजला बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय १७ जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यासाठी महाविद्यालय विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. त्यातून आवश्यक परवानगी व प्रशासकीय मान्यता मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महाविद्यालयात अलीकडेच एम.एस्सी. (झूलॉजी), एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) तसेच बी.एस्सी. सायबर सिक्युरिटी हे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विविध रोजगाराभिमुख व कौशल्याधारित कोर्सेस आणि या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याने अतिरिक्त वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक बनले आहे.
दुसरा मजला पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अधिक प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत प्रयोगशाळा आणि आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासाला गती मिळण्यासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याचे महाविद्यालय प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी सांगितले.
या बैठकीसाठी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुनील गंगुले, बाळासाहेब आव्हाड, महेंद्र काले, महाविद्यालयातील इमारत बांधकाम समितीचे चेअरमन डॉ. बंडेराव तऱ्हाळ, डॉ. माधव यशवंत, डॉ. देविदास रणधीर, डॉ. प्रतिभा रांधवणे, डॉ. निलेश मालपुरे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी आदी उपस्थित होते. महाविद्यालयाच्या या पायाभूत सुविधा विस्ताराच्या निर्णयाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमींनी स्वागत केले आहे.

COMMENTS