नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक सुविधांचा प्रश्न गंभीर असताना मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व

नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक सुविधांचा प्रश्न गंभीर असताना मंगळवार, 11 ऑगस्ट रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिक्षणाच्या मुद्द्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून आले. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत का, शिक्षकांची उपलब्धता, शाळांच्या इमारतींची स्थिती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, शैक्षणिक साधने आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कोणती पावले उचलली जाणार, यावर सभेत ठोस चर्चा झाली नाही. महापालिकेच्या शिक्षण समितीने यापूर्वी केलेल्या शिफारसींच्या अंमलबजावणीचा आढावाही सभेत घेण्यात आला नसल्याने शिक्षण क्षेत्राबाबत प्रशासन आणि महापौरांची भूमिका संशयाच्या भोवर्यात आली आहे. शहरातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर महापालिका शाळांवर अवलंबून असताना त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न महासभेच्या अजेंड्यावर नसणे ही गंभीर बाब असल्याची भावना शिक्षणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, आपल्या प्रभागातील विविध प्रश्न आणि सूचना सभागृहात मांडण्यासाठी काही नगरसेविका प्रयत्न करत असताना त्यांना पुरेसा वेळ न मिळाल्याने त्या आक्रमक झाल्याचेही दिसून आले. महिला नगरसेविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा, आवश्यक निधी, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यावर तातडीने चर्चा होणे गरजेचे आहे. अन्यथा महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचा संदेश नागरिकांमध्ये जाण्याची शक्यता आहे. नांदेड शहराच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौर स्वतः शिक्षिका असल्या तरी त्यांना शिक्षणाविषयी फारशी आस्था किंवा गांभीर्य दिसून आलेले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकंदरीतच महापालिकेचे प्रशासन व सत्ताधारी पक्ष शिक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक याबद्दल निश्चितच वेळ आल्यावर जाब विचारतील अशी काही नागरिकांनी संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

COMMENTS