Homeताज्या बातम्या

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्रातर्फे चारा टंचाई काळातील पशुधन व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन

अंबाजोगाई : दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक 11 जून 2026 रोजी केज तालुक्यातील मौजे कळमअंबा  येथे ‘खेत बचाओ

पंजाब वाचवण्याचे आपसमोर आव्हान ?
कांदळवनाचे जतन करा, कांदळवन वृक्ष लागवड करा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार


अंबाजोगाई : दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक 11 जून 2026 रोजी केज तालुक्यातील मौजे कळमअंबा  येथे ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत चारा टंचाई काळातील पशुधन व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेमध्ये शेतकर्‍यांना चारा टंचाईच्या परिस्थितीत पशुधनाचे शास्त्रीय व्यवस्थापन, पिकांमध्ये संतुलित खतांचा वापर तसेच एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे  प्रगतशील शेतकरी श्री. कांताराव दिगंबर इंगळे  तसेच कृषी विज्ञान केंद्राचे पशुतज्ज्ञ डॉ. रवींद्र कोरके उपस्थित होते. शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र कोरके यांनी सांगितले की, कमी पावसाच्या परिस्थितीत पशुधनासाठी वर्षभर पुरेल इतका चारा उपलब्ध राहावा यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांनी ज्वारी, मका, बाजरी आदी चारा पिकांची लागवड करून मुरघास निर्मिती करावी. उपलब्ध चारा वाया जाऊ नये यासाठी चारा कुट्टी करून जनावरांना द्यावा. उच्च उत्पादन देणारी, वाढीच्या अवस्थेतील व गाभण जनावरांना उत्तम प्रतीचा चारा देणे आवश्यक असून कमी दूध देणारी व अनुत्पादक जनावरे स्वतंत्र ठेवून त्यांचे व्यवस्थापन करावे. पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी पावसाळ्यातील आजारांपासून संरक्षणासाठी नियमित लसीकरण व दर तीन महिन्यांनी जंतनिर्मूलन करण्याचे आवाहन केले. जनावरांच्या अंगावरील तसेच गोठ्यातील बाह्य परजीवींचे नियंत्रण करण्यासोबतच पशुधनाच्या आहारात अपारंपरिक खाद्य स्रोतांचा समावेश करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. निकृष्ट प्रतीच्या चार्‍यावर मीठ व युरिया प्रक्रिया केल्यास त्याची पौष्टिकता वाढते, तसेच अ‍ॅझोला उत्पादनाचा पशुखाद्यामध्ये समावेश केल्यास पोषणमूल्य वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. याशिवाय पशुधनाचे आरोग्य सुधारण्यासाठी व भाकड काळ कमी करण्यासाठी खनिज मिश्रणांचा वापर, पचनक्रिया सुधारण्यासाठी प्रोबायोटिक्सचा वापर तसेच निकृष्ट प्रतीच्या चार्‍याची पचनीयता वाढविण्यासाठी मेटाबोलाईट तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेती विषयक मार्गदर्शन करताना डॉ. कोरके यांनी सध्याच्या काळात शेती उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे नमूद करून मृदापरीक्षण आधारित संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे तसेच शाश्वत व लाभदायी शेतीसाठी एकात्मिक शेती पद्धतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यशाळेस परिसरातील 42 शेतकर्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

COMMENTS