मुंबई : पश्चिम बंगालमधील मतमोजणीचे प्रारंभीचे कल समोर येत असून, या कलांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर जाताना दिसत आहे, तर तृणमूल काँग्रेस पिछाडी

मुंबई : पश्चिम बंगालमधील मतमोजणीचे प्रारंभीचे कल समोर येत असून, या कलांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर जाताना दिसत आहे, तर तृणमूल काँग्रेस पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी भाजप व केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
राऊत यांनी आरोप करताना म्हटले की, ममता बॅनर्जी यांना रोखण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत विविध उपाययोजना करण्यात आल्या. विशेषतः मतदार याद्यांमधून मोठ्या प्रमाणावर नावे वगळण्यात आल्याचा त्यांनी दावा केला. अशा प्रकारे मोठ्या संख्येने मते कमी झाल्यास त्याचा परिणाम निवडणूक निकालावर होतो, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या काळात संपूर्ण यंत्रणा एखाद्या राज्यात केंद्रित केली जाते. मात्र, देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही. वाढती महागाई, बेरोजगारी आणि गुन्हेगारी यांसारख्या मुद्द्यांवर ठोस काम होत नसल्याची टीकाही त्यांनी केली. ममता बॅनर्जी यांनी निकालापूर्वी व्यक्त केलेल्या शंकांबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान वीजपुरवठा खंडित होणे, देखरेखीची साधने बंद पडणे यांसारख्या घटना संशय निर्माण करणार्या असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय बारामती आणि राहुरी येथील विधानसभा पोटनिवडणुकांवर बोलताना राऊत म्हणाले की, या निवडणुका मोठ्या प्रमाणावर प्रतीकात्मक स्वरूपाच्या आहेत. काही ठिकाणी प्रमुख उमेदवार नसल्यामुळे निवडणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच एका जागेवर सहानुभूतीचा घटक प्रभावी ठरू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS