बीड : वैद्यकीय व्यवसायासोबतच समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि स्थानिक समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे बीड जिल्ह्यातील धडाडीचे सामाजिक कार्यक

बीड : वैद्यकीय व्यवसायासोबतच समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि स्थानिक समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणारे बीड जिल्ह्यातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व आंदोलनकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांना यंदाचा प्रतिष्ठित क्रांतीवीर अशफाक उल्ला खान स्मृती राज्यस्तरीय निर्भीड सामाजिक योद्धा पुरस्कार – 2026 जाहीर झाला आहे.
’साप्ताहिक युवा लोकमित्र’च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच सहाव्या वर्षात पदार्पण सोहळ्याच्या औचित्याने ’युवा लोकमित्र परिवार’च्या वतीने या मानाच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. समाजातील अन्यायाविरुद्ध लढणार्या आणि जनहितासाठी स्वतःला झोकून देणार्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा ’युवा लोकमित्र’ने जपली आहे. यंदाच्या उच्चस्तरीय निवड समितीने डॉ. गणेश ढवळे यांच्या निर्भीड, जनहितवादी आणि आंदोलनात्मक कार्याची दखल घेत एकमुखाने त्यांची निवड केली. डॉ. ढवळे हे बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठित वैद्यकीय व्यावसायिक असून, वैद्यकीय सेवेसोबतच त्यांनी विविध सामाजिक प्रश्नांवर प्रभावीपणे भूमिका घेतली आहे. स्थानिक पायाभूत सुविधा, प्रशासकीय दिरंगाई, भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने, मोर्चे व धरणे आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे निर्भीड नेतृत्व म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. यापूर्वी त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय मातृभूमी समाजरत्न पुरस्कार, मराठा भूषण पुरस्कार आणि समाज भूषण पुरस्कार यांसारख्या अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आता या गौरवशाली शृंखलेत आणखी एका प्रतिष्ठित पुरस्काराची भर पडली आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, राजकीय नेते, युवा वर्ग, नागरिक आणि मित्रपरिवाराकडून डॉ. गणेश ढवळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
20 जून रोजी होणार भव्य पुरस्कार वितरण सोहळा
या पुरस्काराचे वितरण शनिवार, 20 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ’ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शी नाका, बीड येथे आयोजित भव्य समारंभात करण्यात येणार आहे. कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.
चौकट
डॉ. गणेश ढवळे यांनी डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करताना सामाजिक जबाबदारीही प्रभावीपणे पार पाडली आहे. अन्यायाविरुद्ध लढणार्या अशा निर्भीड नेतृत्वाला क्रांतीवीर अशफाक उल्ला खान यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय निर्भीड सामाजिक योद्धा पुरस्कार प्रदान करताना युवा लोकमित्र परिवाराला अभिमान वाटत आहे.
– शेख ताहेर जाफर
संपादक, साप्ताहिक युवा लोकमित्र, बीड

COMMENTS