Homeताज्या बातम्या

ड्रोन व चोरट्यांबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये; पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे आवाहन

बेलापूर : रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या ड्रोनचा आणि चोरट्यांबाबत पसरत असलेल्या अफवांचा कोणताही संबंध नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास

इंधनाच्या करात कपात व्हावी
गिरीश डागा यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
जामखेड शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम निकृष्ट

बेलापूर : रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या ड्रोनचा आणि चोरट्यांबाबत पसरत असलेल्या अफवांचा कोणताही संबंध नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत संबंधित ड्रोनबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बेलापूर परिसरात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून विविध चर्चांना उधाण आले होते. या विषयावर नुकत्याच झालेल्या ग्रामसभेतही जोरदार चर्चा झाली होती. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी ड्रोनप्रकरणी पोलिसांनी तातडीने खुलासा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी बेलापूर येथे नागरिकांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीत ग्रामस्थांच्या शंका आणि सूचना जाणून घेत त्यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. ड्रोनबाबत प्रशासन पूर्णपणे दक्ष असून नागरिकांनी घाबरून न जाता अफवांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीत संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले, अभिषेक खंडागळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात, अल्ताफ शेख, सचिन वाघ, पोलीस पाटील शिवाजी भोसले, पत्रकार विष्णुपंत डावरे यांच्यासह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. बैठकीस सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस कर्मचारी संपत बडे, आजीनाथ आंधळे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पत्रकार देविदास देसाई यांनी केले, तर हाजी इस्माईल शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS