बीड: बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीसह प्रशासकीय पातळीवरील प्रयत्न कुठेही कमी पडू दिले जाणार नाहीत, अशी ठाम ग्वाही देतानाच "स्व. अजितद

बीड: बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधीसह प्रशासकीय पातळीवरील प्रयत्न कुठेही कमी पडू दिले जाणार नाहीत, अशी ठाम ग्वाही देतानाच “स्व. अजितदादांच्या स्वप्नातलं बीड आणि त्याचा विकास पूर्ण करण्याचे अभिवचन मी देते,” असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. तसेच स्व. दादांचे बीड जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी खंबीर साथ द्यावी, असे भावूक आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२६-२७ या वर्षासाठी ६२३ कोटी रूपयांच्या विकास आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात ही बैठक पार पडली. या सभेस पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रकाश सोळंके, आमदार धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार सुरेश धस, आमदार नमिता मुंदडा, बसवराज पाटील, सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशासकीय शिस्त व लोकप्रतिनिधींच्या मागण्यांचा समन्वय
बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा तयार करताना दादांनी दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन केले जाईल. कोणतेही काम १५ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचे असणार नाही आणि एकाच कामाचे तुकडे करून स्वतंत्र अंदाजपत्रके तयार केल्यास त्याला मान्यता दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांचा समन्वय राखण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, सभेच्या सुरुवातीला पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ‘स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती २०२६’ स्पर्धेच्या अधिकृत लोगो व शुभंकरचे अनावरण करण्यात आले.
लोकप्रतिनिधींनी मांडल्या विविध समस्या
- मंत्री पंकजा मुंडे: पालकमंत्री सुनेत्राताईंचे काम स्व. दादांसारखेच असून लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मूलभूत सोयी-सुविधांवर भर द्यावा.
- आमदार धनंजय मुंडे: अतिवृष्टी नुकसानभरपाई निधी, ग्रामीण रस्ते आणि धर्मापुरी येथील पुरातन मंदिर विकासासाठी विशेष निधीची मागणी केली.
- खासदार बजरंग सोनवणे: रस्ते जोडणी, पाणीपुरवठा योजनांमधील अपहारावर कारवाई, वीज अपघातातील मृतांना मदत आणि पीक कर्ज मर्यादा ३ लाखांवरून ७ लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली.
- इतर लोकप्रतिनिधी: आमदार नमिता मुंदडा यांनी कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाबाबत जनजागृती, आमदार संदीप क्षीरसागर यांनी मराठा भवन व मुलींचे वसतिगृह, आमदार सुरेश धस यांनी दूध उत्पादक व पशुपालकांच्या समस्या, तर आमदार प्रकाश सोळंके यांनी रस्ते-पुलांची दुरुस्ती व औद्योगिक गुंतवणुकीचा मुद्दा उपस्थित केला.
आराखड्यातील प्रमुख विकास तरतुदी:
- पशुसंवर्धन विभाग: कृत्रिम रेतन केंद्र इमारतीसाठी ५.२७ कोटी, साकूड पशुपैदास प्रक्षेत्र पाणीपुरवठ्यासाठी २.९९ कोटी, तर १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ४.८९ कोटी मंजूर.
- पर्यावरण व वनविभाग: ‘हरित बीड’ मोहिमेअंतर्गत यंदा ६५ लाख ४९ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट.
- ग्रामपंचायत जनसुविधा: ३७.५३ कोटींचा निधी मंजूर; ज्यामध्ये ९१ ठिकाणी स्मशानभूमी शेड व ग्रामपंचायत इमारतींचा समावेश.
- ऊर्जा विकास: ६१ शासकीय कार्यालयांमध्ये अपारंपरिक ऊर्जा उपकरणांसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद.
- ग्रंथालय व पर्यटन: बीड जिल्हा ग्रंथालय इमारतीसाठी ४.९५ कोटींच्या एकूण आराखड्यापैकी २ कोटींना मंजुरी; तसेच ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर विकासासाठी ११.२१ कोटींची विशेष तरतूद.

COMMENTS