पुणे : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने प्रशासकीय वर्तुळ हादरले असून, निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा दु

पुणे : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात घडलेल्या भीषण अपघाताने प्रशासकीय वर्तुळ हादरले असून, निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (वय 52) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बनकरफाटा-जुन्नर मार्गावरील गणपती फाट्याजवळील धोकादायक ‘एस कॉर्नर’ येथे हायवा डंपर आणि कार यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या जोरदार धडकेत ही दुर्घटना घडली. कर्तव्यदक्ष अधिकार्याच्या अकाली निधनाने महसूल विभागात शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अनंता गवारी हे त्यांच्या कारने बनकरफाट्याकडे जात असताना पांगरीमाथा बाजूकडून येणार्या हायवा डंपरने वळणावर नियंत्रण गमावत समोरासमोर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आणि वाहन रस्त्याच्या विरुद्ध दिशेला फेकले गेले. अपघाताच्या तीव्रतेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अपघातात अनंता गवारी यांच्यासह महसूल कर्मचारी विजय खारतोडे गंभीर जखमी झाले, तर तुषार कोरडे यांना किरकोळ दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना ओतूर येथील रुग्णालयात हलवले. मात्र गवारी यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले. दुर्दैवाने, उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. घटनेनंतर काही काळ बनकरफाटा-जुन्नर मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक तपासात संबंधित डंपर हा बांधकाम साहित्य वाहतूक करणार्या कंपनीचा असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील रस्ते सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः ‘एस कॉर्नर’सारख्या धोकादायक वळणावर वेगाने धावणारी जड वाहने, अपुरी सूचनाफलक व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

COMMENTS