मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला शुक्रवारी अचानक आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका बसल्याने जुहू विमानतळावर आपत्कालीन अवतरण करा

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला शुक्रवारी अचानक आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका बसल्याने जुहू विमानतळावर आपत्कालीन अवतरण करावे लागले. वैमानिकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संभाव्य दुर्घटना टळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपमुख्यमंत्री शिंदे हे अधिकार्यांसह महालक्ष्मी येथून मुरबाडकडे एका विवाह सोहळ्यासाठी रवाना झाले होते. सुरुवातीला हवामान अनुकूल असले तरी ठाणे-कल्याण परिसरात पोहोचताच अचानक धुळीचे वादळ आणि वेगवान वार्यांचा सामना हेलिकॉप्टरला करावा लागला. काही वेळातच वातावरण अधिकच ढगाळ झाले आणि धुळीमुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली. वादळी परिस्थितीत हेलिकॉप्टर सुमारे वीस मिनिटे हवेत अस्थिर अवस्थेत राहिले. जोरदार वार्यांमुळे हेलिकॉप्टरला सतत हेलकावे बसत होते. परिस्थितीची गंभीरता ओळखून वैमानिकाने तातडीने हवाई वाहतूक नियंत्रण विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हेलिकॉप्टरचे जुहू विमानतळावर सुरक्षित अवतरण करण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. वैमानिकाच्या वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा प्रशासन व राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यातील अनेक भागांत हवामानाचा बदलता स्वरूप कायम असून मराठवाडा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, बीड, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये वादळी वार्यासह पाऊस पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

COMMENTS