अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात स्वतःला पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या 'झोंटिंग' नावाच्या तोतया पत्रकाराच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्य

अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरात स्वतःला पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या ‘झोंटिंग’ नावाच्या तोतया पत्रकाराच्या विरोधात गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पोलिसांच्या नावाचा वापर करून एका प्रकरणातील व्यक्तीकडे पैशांची मागणी केल्याची ऑडिओ क्लिप ‘दैनिक लोकमंथन’च्या हाती आली आहे.
समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी फोन करण्याऐवजी झोंटिंग नावाच्या तोतया पत्रकाराने संबंधितांना फोन करून “तुम्ही चार आरोपी आहात, तर पोलिसांना पैसे द्यावे लागतील. मी तुम्हाला मदत करतोय,” असा आव आणून थेट पैशांची मागणी करताना तो दिसून येत आहे.
या ऑडिओ क्लिपमधील पुराव्यानुसार, कोतवाली पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात त्याच्या पत्नीने घरगुती वादातून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कोणत्याही अधिकृत पोलीस अधिकाऱ्याचा संपर्क नसताना तोतया पत्रकार झोंटिंग याने संबंधित व्यक्तीशी मोबाईलवरून थेट संपर्क साधला. संभाषणादरम्यान “तुला अटक होऊ देणार नाही, प्रकरण मिटवता येईल. फिर्यादी कुठेही तक्रार करायला गेली तरी काही होणार नाही,” अशी विधाने करण्यात आली. तसेच पोलिसांच्या नावाने आर्थिक व्यवहार करण्याचा प्रस्ताव देत पैशांची मागणी करण्यात आली. “चार आरोपी आहेत, तर चार पोलिसांना पैसे द्यावे लागतील, किमान ५० हजार रुपये तरी तयार ठेव,” अशी थेट मागणी या ऑडिओ क्लिपमध्ये केली आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांना रक्कम द्यावी लागेल, असे सांगून संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणामुळे अहिल्यानगर पोलीस विभागाची प्रतिमा मलीन होत असल्याने, पोलिसांनी या तोतया पत्रकारावर पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी आणि त्यांच्या नावे थेट पैसे मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्याची खरी गरज आहे. तोतया पत्रकार झोंटिंग याने यापूर्वीही अशाच प्रकारे कोणाकडून पैसे उकळले आहेत का? कोणत्या व्यक्तींना खोट्या गुन्ह्यांच्या भीतीने दबावाखाली आणले आहे का? तसेच कोणत्या पोलीस ठाण्यांशी त्याचे संबंध आहेत? याची सखोल चौकशी होण्याची मागणी जोर धरत आहे.

COMMENTS