बीड : शासनाच्या कामकाजावर अनेकदा विलंबाबाबत टीका होत असताना, बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळूकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत बेलेश्वर वस्तीतील शे

बीड : शासनाच्या कामकाजावर अनेकदा विलंबाबाबत टीका होत असताना, बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील मुळूकवाडी ग्रामपंचायत अंतर्गत बेलेश्वर वस्तीतील शेतरस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने दाखवलेली तत्परता लक्षवेधी ठरली आहे. शुक्रवारी नागरिकांनी रस्त्याची अडचण दूर करण्याची मागणी केली आणि केवळ दोन दिवसांत, रविवारी सुट्टीच्या दिवशीही महसूल प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कार्यवाहीची दिशा निश्चित केली.
सुमारे २०० लोकसंख्या असलेल्या बेलेश्वर वस्तीतील नागरिकांचा दैनंदिन जीवनप्रवास शेती, शालेय शिक्षण, आरोग्य सेवा आणि बाजारपेठेशी जोडलेल्या या रस्त्यावर अवलंबून आहे. मात्र अनेक वर्षांपासून वापरात असलेला हा मार्ग काही ठिकाणी अडथळाग्रस्त झाल्याने नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची तीव्रता वाढल्याने स्थानिक महिलांनी लहान मुलांसह थेट तहसील कार्यालय गाठत प्रशासनासमोर व्यथा मांडली होती. तहसीलदारांनी नागरिकांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतल्यानंतर तातडीने स्थळ पाहणीचा निर्णय घेतला.
त्यानुसार रविवारी महसूल विभागाचे पथक प्रत्यक्ष बेलेश्वर वस्तीवर दाखल झाले. मंडळ अधिकारी उज्वला राऊत यांनी वस्तीतील नागरिकांशी संवाद साधत रस्त्याची अडचण, वळसा घ्यावा लागणारा मार्ग आणि शेतीमाल वाहतुकीतील अडथळे याबाबत सविस्तर माहिती घेतली. उन्हाच्या तीव्रतेतही त्यांनी प्रत्यक्ष नोंदी करून परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. प्रशासनाने पुढील महसुली प्रक्रिया आणि अहवालाच्या आधारे तातडीने निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रशासनाच्या या जलद गतीने घेतलेल्या दख्खलीमुळे वस्तीतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS