चकलांबा : गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दारू, मटका,

चकलांबा : गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दारू, मटका, गुटखा विक्री तसेच अवैध वाळू उपशामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनि (सहाय्यक पोलीस निरीक्षक) सचिन इंगळे यांच्या कार्यकाळात अवैध व्यवसायांवर नियंत्रण येण्याऐवजी ते वाढल्याचे चित्र दिसत असल्याने नागरिकांनी त्यांच्या बदलीची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात दिवसाढवळ्या अवैध व्यवहार सुरू असूनही संबंधितांवर कोणतीही प्रभावी कारवाई होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचा गैरफायदा काही घटकांकडून घेतला जात असल्याचाही आरोप आहे. या वाढत्या अवैध धंद्यांमुळे ग्रामीण भागातील शांतता धोक्यात आली असून तरुणांवर याचे विपरीत परिणाम होत आहेत. या प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सुरळेगावात दिवसाढवळ्या वाळू उपशाचे आरोप; कारवाईबाबत प्रश्न सुरळेगाव परिसरात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. चकलांबा पोलीस ठाण्याकडून या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याची चर्चा परिसरात आहे. या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली, तरी प्रशासनाने या वस्तूस्थितीची चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS