Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांत संताप

पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत महिलांचे नगरपरिषदेला निवेदन शेवगाव : सुमारे ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहराला गेल्या अनेक दिवसा

संस्था विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम : काकडे
विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा  : डॉ. दुकळे
शेवगामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू

पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाण्याबाबत महिलांचे नगरपरिषदेला निवेदन

शेवगाव : सुमारे ५० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहराला गेल्या अनेक दिवसांपासून बारा ते पंधरा दिवसांनी आणि तेही अत्यंत अल्प प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणारे पिण्याचे पाणी पिवळसर व दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सोमवारी शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरात पाणीपुरवठा झाला असता नळातून येणारे पाणी पिवळसर रंगाचे असून त्याला कुबट वास येत असल्याची तक्रार सौ. स्नेहल दत्तात्रय फुंदे यांच्यासह परिसरातील महिलांनी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली. संबंधित दूषित पाण्याचे नमुने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे देणार असल्याची माहिती श्रीमती फुंदे यांनी दिली.

दरम्यान, महिला भगिनींच्या शिष्टमंडळाने शहरानजीक खुंटेफळ रस्त्यावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी पाणी साठवण वॉल चेंबरमधील पाणी अशुद्ध असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली असता, जायकवाडी जलाशयाच्या बॅकवॉटरमधून येणाऱ्या पाण्यात गेल्या काही दिवसांपासून पालापाचोळा, गवत तसेच शेवाळे आढळत असल्याचे सांगण्यात आले. पाणी शुद्धीकरणासाठी दररोज टीसीएल क्लोरीन व तुरटीचा वापर करून प्रक्रिया केली जात असल्याचेही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.

मात्र, जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वित आहे की नाही, याबाबत शंका निर्माण झाल्याचे श्रीमती फुंदे यांनी नमूद केले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी समक्ष पाहणी करून नागरिकांना उन्हाळ्यात सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दिवसेंदिवस वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्यात काही प्रमाणात सुधारणा करून किमान पाच ते सहा दिवसांतून एकदा नियमित पाणीपुरवठा करावा, यासाठी महिलांच्या शिष्टमंडळासह संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शहरातील पाणीप्रश्न अधिक तीव्र होऊ नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

COMMENTS