Homeताज्या बातम्या

नांदेडमध्ये राडा! ‘ठाकरे’ गट सोडून गेलेल्या ३ खासदारांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला; विमानतळाबाहेर गोंधळ, ३९ जण अटकेत

नांदेड  : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे

कोलांट्या उड्यांचे राजकारण अन् कृष्णा आष्टीकरांवर पराभवाचे सावट; ‘ऑपरेशन टायगर’मुळे नांदेड विधानपरिषदेत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली
वडिलांची वेगळी वाट, मुलाची उद्धव ठाकरेंना निष्ठेची ग्वाही; नांदेड विधानपरिषदेत आष्टीकर कुटुंबामुळे मतदारांमध्ये संभ्रम?
खासदारांना फक्त हदगाव-हिमायतनगरचेच प्रेम?किनवट-माहूरकरांना थेट ’दुजाभाव’; आष्टीकरांच्या पत्राने राजकीय वातावरण तापले!

नांदेड  : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिकांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू हरिभाऊ जाधव आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात मंगळवारी नांदेडमध्ये आक्रमक आंदोलन छेडले. नांदेड विमानतळाबाहेर तसेच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव पाटीजवळ खासदारांच्या ताफ्याला अडवत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही खासदार एकाच विमानाने नांदेड विमानतळावर दाखल झाले होते. विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुमारे दोनशेहून अधिक कार्यकर्ते जमा झाले होते. खासदार बाहेर पडताच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी आपली गाडी वळवून तेथून माघार घेतल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि खासदार बंडू जाधव हे विमानतळावरून हदगाव मतदारसंघाच्या दिशेने रवाना झाले. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्या नेतृत्वाखालील शिवसैनिकांनी अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ त्यांचा ताफा गाठला. ‘गद्दारांना जिल्ह्यात फिरू देणार नाही’ अशा घोषणा देत शिवसैनिकांनी काही काळ गाड्या पुढे जाऊ दिल्या नाहीत. यामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख बबन बारसे यांच्यासह नांदेड उत्तर तालुकाप्रमुख सुनील पाटील, मुदखेड तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर, दक्षिण महानगरप्रमुख मनोज यादव, सिडको शहरप्रमुख अर्जुन ठाकूर, पिंटू सूनपे, गजानन गव्हाणे, नवनाथ जोगदंड, परशुराम सावंत, पुरभाजी जाधव, नितीन सरोदे, वकील सावंत, गणपत सोंदे, गिरजाराव पाटील, पप्पू राजेगोरे, शंकर हाफगुंडे, नितीन गिरी, पिंटू बिचेवार आणि अमोल गुंजकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
परिस्थिती तणावपूर्ण बनत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्या ३९ शिवसैनिकांना ताब्यात घेत अटक केली. यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, काही वेळानंतर सर्वांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून आगामी काळात ठाकरे गट आणि पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. या आंदोलनानंतर शिवसैनिकांनी गद्दारांविरोधातील लढा अधिक आक्रमक करण्याचा इशाराही दिला आहे.

COMMENTS