नांदेड : राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित "ऑपरेशन टायगर" बाबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी स्
नांदेड : राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित “ऑपरेशन टायगर” बाबत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी स्पष्ट भूमिका घेत ही संपूर्ण चर्चा केवळ अफवांचा भाग असल्याचे म्हटले आहे. राजकारणात “ऑपरेशन टायगर” नावाचे कोणतेही वास्तव अस्तित्व नसून, कार्यकर्ते आणि जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा चर्चा रंगवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आष्टीकर यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये “ऑपरेशन टायगर”ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. या कथित घडामोडींमध्ये मराठवाड्यातील काही खासदारांची नावे घेतली जात असून त्यात त्यांचेही नाव जोडले जात आहे. मात्र, या सर्व चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. शिवसेना (शिंदे गट) नेते व आमदार संजय शिरसाट यांनी “ऑपरेशन टायगर” संदर्भात केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना आष्टीकर म्हणाले, “मला या कथित ऑपरेशनबाबत कोणतीही माहिती नाही. जर संजय शिरसाट यांना याची इतकी सविस्तर माहिती असेल, तर त्यांनीच जनतेसमोर येऊन नेमके काय सुरू आहे, कोण सहभागी आहे आणि या कथित ऑपरेशनचा उद्देश काय आहे, हे स्पष्ट करावे.”
‘मातोश्री’वरील बैठकीकडे लक्ष १४ जून रोजी मुंबई येथील ‘मातोश्री’ येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीसह विविध संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बैठकीबाबत बोलताना आष्टीकर म्हणाले की, सध्या ते स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. माझ्या मुलाला निवडणुकीच्या मैदानात उतरवले असून प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहे. आमच्या भागातील सर्व राजकीय घडामोडींची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. तरीही पक्षाची बैठक महत्त्वाची असल्याने मुंबईत जाऊन बैठकीला उपस्थित राहण्याचा माझा प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.
मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न? विरोधकांवर टीका करताना आष्टीकर म्हणाले की, जनतेसमोरील खऱ्या प्रश्नांवर चर्चा होऊ नये म्हणून काल्पनिक आणि दिशाभूल करणारे विषय पुढे आणले जात आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते आणि जनतेने अशा कपोलकल्पित अफवांवर विश्वास ठेवू नये. राज्यातील जनतेसमोरील विकास, रोजगार, शेती आणि स्थानिक प्रश्न यावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, “ऑपरेशन टायगर”च्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमीवर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेल्या या स्पष्ट वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले असून, १४ जून रोजी होणाऱ्या ‘मातोश्री’वरील बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS