देशभरात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या नीट (नीट) आणि जेईई (जेईई) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर खासगी कोचिंग क्ल

देशभरात वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या नीट (नीट) आणि जेईई (जेईई) परीक्षांच्या पार्श्वभूमीवर खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या वर्चस्वाविरोधात आता तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. शिक्षण हे एकेकाळी सेवा आणि संस्कार देणारे क्षेत्र मानले जात होते; मात्र आज ते कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा व्यवसाय बनल्याची भावना पालक, विद्यार्थी आणि सामाजिक माध्यमांतून सातत्याने व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आधार घेत त्यांच्या भावनांशी आणि पालकांच्या आर्थिक परिस्थितीशी खेळ करणार्या कोचिंग उद्योगावर नियंत्रण आणण्याची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.
गेल्या काही वर्षांत देशात स्पर्धा परीक्षांचे प्रमाण वाढले आणि त्यासोबत कोचिंग क्लासेसचे जाळेही मोठ्या प्रमाणावर विस्तारले. मोठमोठ्या जाहिराती, टॉपर विद्यार्थ्यांचे फोटो, 100 टक्के यश अशा घोषणा आणि डॉक्टर-इंजिनिअर बनविण्याची स्वप्ने दाखवत लाखो विद्यार्थ्यांना या व्यवस्थेकडे आकर्षित केले जाते. मात्र वास्तवात हजारो विद्यार्थ्यांमधून अत्यल्प विद्यार्थ्यांनाच यश मिळते, तर उर्वरित विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि आर्थिक नुकसानाची कुणीही जबाबदारी घेत नाही, अशी टीका आता जोर धरत आहे. विशेष म्हणजे, अनेक कोचिंग संस्था विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेपेक्षा त्यांच्या पालकांची आर्थिक क्षमता पाहून प्रवेश देत असल्याचा आरोप होत आहे. दहावी किंवा बारावीमध्ये सामान्य गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही तू डॉक्टर होऊ शकतोस, तुझ्यात क्षमता आहे अशी मोठी स्वप्ने दाखवून लाखो रुपयांची फी आकारली जाते. काही पालक तर मुलांच्या भविष्यासाठी कर्ज काढतात, शेती विकतात किंवा बचतीचा पैसा खर्च करतात. परंतु वर्षानुवर्षे कोचिंग घेतल्यानंतरही अपेक्षित यश मिळत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कोचिंग संस्थांच्या जाहिरातींच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक आमिष दाखवून हे आमच्या संस्थेचे विद्यार्थी होते असा दावा केल्याचे प्रकार समोर येत आहेत. काही वेळा विद्यार्थी फक्त टेस्ट सिरीजला सहभागी असतानाही त्यांचे फोटो वापरून संस्थांची प्रसिद्धी केली जाते. त्यामुळे पालकांची दिशाभूल होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आणि पालक संघटनांकडून करण्यात येत आहे. याशिवाय, प्रवेशावेळी नामांकित ‘स्टार’ शिक्षकांचे डेमो क्लास दाखवून विद्यार्थ्यांना आकर्षित केले जाते; मात्र प्रवेश पूर्ण झाल्यानंतर तेच शिक्षक बदलले जातात आणि सामान्य शिक्षकांकडे अध्यापनाची जबाबदारी दिली जाते, अशीही तक्रार अनेक पालकांनी केली आहे. विशेष बॅचच्या नावाखाली फक्त मोजक्या हुशार विद्यार्थ्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाते, तर उर्वरित विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस केवळ फी भरण्याचे केंद्र बनत असल्याची भावना वाढीस लागली आहे. परीक्षा जवळ आल्यावर गेस पेपर, इनसाइड माहिती, स्पेशल नोट्स किंवा विशेष बॅचच्या नावाखाली पुन्हा अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचे आरोपही समोर आले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भीतीचा आणि पालकांच्या अस्वस्थतेचा फायदा घेतला जात असल्याची टीका होत आहे. काही ठिकाणी खासगी कनिष्ठ महाविद्यालये आणि कोचिंग संस्थांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कमिशनचे छुपे व्यवहार होत असल्याच्याही चर्चा रंगू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण हा या संपूर्ण व्यवस्थेतील सर्वात गंभीर मुद्दा ठरत आहे. नीट किंवा जेईई नाही तर आयुष्य संपले अशी भीती समाजात निर्माण झाली असून, त्यामुळे विद्यार्थी प्रचंड दडपणाखाली जीवन जगत आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास, टेस्ट, स्पर्धा आणि रँकिंगच्या चक्रात अनेक विद्यार्थ्यांचे बालपण हरवत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. अपयश आल्यास विद्यार्थ्यांना नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागत असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. यासोबतच कोचिंग क्लासेसमधील प्रचंड गर्दीही चिंतेचा विषय बनली आहे. एका वर्गात शेकडो विद्यार्थी बसवले जात असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे अशक्य होत आहे. शिक्षणापेक्षा बॅच आणि रिझल्ट यांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मूलभूत हेतूच हरवत चालल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरत आहे. सर्व खासगी कोचिंग संस्थांचे आर्थिक आणि शैक्षणिक ऑडिट बंधनकारक करावे, फी नियंत्रणासाठी कठोर कायदा लागू करावा, खोट्या जाहिराती करणार्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सुविधा सक्तीच्या कराव्यात, अशा मागण्या विविध स्तरांतून पुढे येत आहेत. विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शासनाने मोफत आणि उच्च दर्जाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित होत आहे. शिक्षण ही समाज घडविण्याची प्रक्रिया असून ती नफेखोरीचे साधन बनू नये, अशी भावना आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शिक्षण वाचवा, विद्यार्थी वाचवा आणि पालक वाचवा हा संदेश आता समाजमाध्यमांपासून सार्वजनिक चर्चांपर्यंत पोहोचू लागला असून, कोचिंग उद्योगातील या कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून शिक्षण व्यवस्थेतील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज व्यक्त होत आहे.

COMMENTS