छ.संभाजीनगर : दिल्लीतील परीक्षा गैरव्यवहारविरोधी आंदोलनामुळे चर्चेत आलेले ‘कॉकरोच जनता पक्ष’ या उपहासात्मक डिजिटल व्यासपीठाचे संस्थापक अभिजीत दीप

छ.संभाजीनगर : दिल्लीतील परीक्षा गैरव्यवहारविरोधी आंदोलनामुळे चर्चेत आलेले ‘कॉकरोच जनता पक्ष’ या उपहासात्मक डिजिटल व्यासपीठाचे संस्थापक अभिजीत दीपके रविवारी पहाटे छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले. जवळपास वर्षभरानंतर आई-वडिलांची भेट घेण्यासाठी ते वाळूज महानगर परिसरातील आपल्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या आगमनानंतर कुटुंबीयांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
अभिजीत दीपके यांनी शनिवारी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर आंदोलन केले होते. सामाजिक माध्यमांवरून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाला देशभरात मोठी प्रसिद्धी मिळाली. आंदोलनात प्रत्यक्ष उपस्थिती मर्यादित असली तरी त्याची चर्चा विविध स्तरांवर झाली. आंदोलनाची मुदत सायंकाळपर्यंत निश्चित करण्यात आली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीपके यांनी नियोजित वेळेपूर्वी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर त्यांनी सामाजिक माध्यमांद्वारे आई-वडिलांना भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना होत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार ते रात्री उशिरा शहरात दाखल झाले आणि पहाटेच्या सुमारास आपल्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. सुरुवातीला तैनात करण्यात आलेल्या सुरक्षाव्यवस्थेत रात्री उशिरा मोठी वाढ करण्यात आली. दीपके यांच्या निवासस्थानाबाहेर सुमारे 80 पोलिस कर्मचारी आणि 10 अधिकारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अलीकडील आंदोलनामुळे निर्माण झालेली सार्वजनिक उत्सुकता आणि संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे. दीपके यांच्या आगमनामुळे परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पुढील भूमिकेकडे समर्थकांसह विविध स्तरांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS