सांगली : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाीटल (Manoj Jarange patil) यांच्या ताफ्यातील एका कार्यकर्त्याचा अपघात झाल्याची घटना
सांगली : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाीटल (Manoj Jarange patil) यांच्या ताफ्यातील एका कार्यकर्त्याचा अपघात झाल्याची घटना घडली. कडेगावहुन विटाकडे येत असताना जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील कारला बसने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात (Accident) एका कार्यकर्त्याच्या पाठीला मार लागला आहे. याबाबत माहिती समजताच जरांगे पाटील यांनी स्वतः बसलेल्या डिफेंडर गाडीतून कार्यकर्त्याला आधी विटामधील सरकारी रुग्णालयात नेले. त्यानंतर, तिथून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मनोज जरांगे पाटील कार्यकर्त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याची खात्री केल्यानंतर पुन्हा विटामधील नेवरी नाका येथे स्वागतासाठी रवाना झाले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण लढ्यासाठी दौरा सुरू केला असून आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप होत आहे. सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे यांचे भव्य दिव्य पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी ढोल ताशा झांज पथक आणि 30 जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात आले. दरम्यान, प्रचंड गर्दी झाल्यामुळे त्यांच्या ताफ्यातील दोन ते तीन गाड्या बसल्या धडकल्या. या धडकेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली. जरांगे पाटील यांच्या ताफ्यात किरण भगत या कार्यकर्त्याला बसची धडक बसली. या धडकेत कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने संकट टळलं. मात्र, सांगलीतील विटा शहराकडे येत असताना आंबेगावजवळ जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. तरीही, अपघातात जखमी झालेल्या कार्यकर्त्याला मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: आपल्या डिफेंडर कारमधून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता, जखमी झालेल्या कार्यकर्त्यास खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते. डिफेंडर गाडी कोणाची, जरांगे पाटलांनी सांगितलं आपल्याकडे असलेल्या डिफेंडर कारबाबत मनोज जरांगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते मंगळवारी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, ती डिफेंडर गाडी माझी नाही, माझ्याकडे एक रुपया नाही. एका कार्यकर्त्याने, मला त्याचे नाव माहिती नाही, त्याने ही डिफेंडर कार मला वापरायला दिली आहे. त्याने मला सांगितलं की, मला देवाने भरपूर दिले आहे. तो म्हणाला की, पाटील तुम्ही माझ्या गाडीत बसा. त्यामुळे मी ही गाडी घेऊन दौऱ्यात आलो, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. मराठा समाजातील लोक मला त्यांच्या गाडीत बसवतात. प्रत्येक जातीत श्रीमंत वर्ग आहे. हे लोक दुसऱ्यांना कुणालाही विचारत नाही मी काय करू. माझा समाज म्हणतो, बसा गाडीत, मी बसतो, माझा समाज माझ्यावर जीव लावतो. या गाडीच्या काचा फुटल्या आहेत. 50-50 पोरं त्या गाडीला लटकतात, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

COMMENTS