नांदेड : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका इंदोरच्या धर्तीवर शहराच्या सर्वांगीण सुशोभीकरणासाठी सज्ज झाली असून स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, चौ

नांदेड : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका इंदोरच्या धर्तीवर शहराच्या सर्वांगीण सुशोभीकरणासाठी सज्ज झाली असून स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, चौकांचे सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संवर्धनाचा व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानात देशात सातत्याने अव्वल ठरलेल्या इंदोरच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून तेथील संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याची तयारी छत्रपती संभाजीनगरने सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेडकरांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या ‘विकसित नांदेड’ या संकल्पनाम्यात नेमके याच प्रकारच्या विकासाचे आश्वासन देण्यात आले होते. संकल्पनाम्याच्या प्रास्ताविकात माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी इंदोर महानगरपालिकेच्या धर्तीवर नांदेडमध्ये स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, आधुनिक घनकचरा व्यवस्थापन, मूलभूत सुविधांचे सक्षम जाळे आणि नियोजनबद्ध नागरी विकास उभारण्याची स्पष्ट भूमिका मांडली होती. इतकेच नव्हे, तर ‘2050 चे नांदेड’ या दूरदृष्टीवर आधारित स्वयंपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि शाश्वत शहर उभारण्याचा संकल्पही मांडण्यात आला होता. इंदोरने गेल्या काही वर्षांत घनकचर्याचे घराघरातून संकलन, ओला-सुका कचरा विलगीकरण, कचर्यापासून जैवगॅस व ऊर्जा निर्मिती, सार्वजनिक स्वच्छतेत लोकसहभाग आणि हरित विकास यामुळे संपूर्ण देशासाठी आदर्श निर्माण केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यपरंपरेचा वारसा जपत इंदोरने विकास आणि स्वच्छतेचा उत्कृष्ट समतोल साधला आहे.
नांदेडलाही धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक येथे येतात. त्यामुळे शहरातील स्वच्छता, नदी संवर्धन, रस्त्यांचे सौंदर्यीकरण, आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प, हरित पट्टे, स्मार्ट वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरणपूरक नागरी सुविधा या केवळ विकासाच्या योजना नसून काळाची गरज आहेत. संभाजीनगरने इंदोरच्या धर्तीवर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत असताना, नांदेडमध्ये ‘विकसित नांदेड’ संकल्पनाम्यातील आश्वासनांची अंमलबजावणी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबत नागरिक उत्तरांची अपेक्षा व्यक्त करत आहेत. नांदेडनेही 2050 च्या विकासदृष्टीला केवळ संकल्पनाम्यापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृती आराखड्यात रूपांतरित करावे, अशी मागणी आता अधिक ठळकपणे पुढे येत आहे. कारण स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक आणि नियोजनबद्ध नांदेड हे केवळ राजकीय आश्वासन नसून प्रत्येक नांदेडकराचे स्वप्न आहे.

COMMENTS