किनवट : तालुक्यातील आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविकांच्या संदर्भात ’दै. लोकमंथन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

किनवट : तालुक्यातील आरोग्य विभागातील आशा स्वयंसेविकांच्या संदर्भात ’दै. लोकमंथन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या बातमीचा धसका घेत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने तात्काळ आदेश निर्गमित करून, 23 जुलै 2020 नंतर नियुक्त झालेल्या सर्व आशा स्वयंसेविकांना ’लहान कुटुंब’ असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी, किनवट यांनी 10 एप्रिल 2026 रोजी काढलेल्या अधिकृत पत्रात स्पष्ट नमूद केले आहे की, ज्या आशा स्वयंसेविकांची निवड 23/07/2020 नंतर झालेली आहे, त्यांना शासनाच्या नियमानुसार लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य आहे. या पत्रात थेट ’दैनिक लोकमंथन मधील बातमीनुसार’ असा संदर्भ देण्यात आला असून, बातमी प्रसिद्ध होताच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. आरोग्य विभागाने सर्व गटप्रवर्तकांना आदेश दिले आहेत की, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित आशा स्वयंसेविकांकडून ’प्रतिज्ञापत्र नमुना अ’ भरून घ्यावा. ही सर्व कागदपत्रे येत्या सोमवारी, दि. 13 एप्रिल 2026 पर्यंत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात जमा करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असेही प्रशासनाने पत्राद्वारे बजावले आहे. या पत्राची प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे. ’दै. लोकमंथन’ ने आशा स्वयंसेविकांच्या नियुक्ती आणि नियमावलीबाबत जो वस्तुनिष्ठ वृत्तांत प्रसिद्ध केला होता, त्याला आता यश आले असून आरोग्य विभागातील या निर्णयामुळे पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे.

COMMENTS