भुवनेश्वर : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांनंतर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि भारतीय ज

भुवनेश्वर : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांनंतर देशभरात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडली आहे. विद्यार्थी आंदोलनादरम्यान काही घटकांनी “जेन जी” अर्थात नव्या तरुण पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप प्रधान यांनी केला. आपल्या दृष्टीने मंत्रिपदापेक्षा देशातील तरुणांचे भवितव्य आणि त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी अधिक महत्त्वाची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सुमारे दोन आठवड्यांनी प्रधान यांचे हे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर २५ जुलै रोजी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. भुवनेश्वर येथील जीएम विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना त्यांनी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणासह विद्यार्थी आंदोलन आणि आपल्या राजीनाम्याबाबतची भूमिका स्पष्ट केली. “जेन जी” पिढीबाबत बोलताना प्रधान म्हणाले की, ही भारतातीलच मुले आहेत आणि त्यांच्याशी आपला कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही. भारतात दरवर्षी सुमारे दोन कोटी मुलांचा जन्म होतो. मागील दशकात देशात जवळपास २० कोटी मुले जन्माला आली आहेत. या पिढीच्या स्वतःच्या आकांक्षा, अपेक्षा आणि भविष्यासंदर्भातील स्वप्ने आहेत. पुढील काळात भारताला जगात अग्रस्थानी नेण्यात ही तरुण पिढी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे त्यांनी नमूद केले. तरुणांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून पाहता कामा नये, असेही प्रधान यांनी सांगितले. देशातील तरुणांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या राजीनाम्याबाबतही प्रधान यांनी भाष्य केले. मंत्रिपद टिकवण्यापेक्षा देश आणि तरुणांचे भवितव्य अधिक महत्त्वाचे असल्याने आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची तयारी व्यक्त केली होती, असा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सरकारने संवेदनशीलतेने विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.

COMMENTS