Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

केमिस्ट संघटनेच्या निवडणुकीत ‘फिक्सिंग’चा आरोपमतदार यादीत संशयास्पद घुसखोरी; निवडणूक अधिकार्‍यांवर पक्षपातीपणाचे गंभीर आरोप

नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीभोवती आता संशय, आरोप आणि आंतरिक ‘फिक्सिंग’च्या चर्चांचे सावट गडद झाले आहे. मत

नांदेड जिल्ह्याचा निकाल 15 टक्क्यांनी घसरला ; मुलींचे पुन्हा वर्चस्व, अर्धापूर अव्वल तर कंधार सर्वात कमी
अक्षय तृतीयेनिमित्त सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा; 3 हजार ग्लास ऊसाच्या रसाचे वाटप
कर्तव्यावरील खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन !

नांदेड जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या द्वैवार्षिक निवडणुकीभोवती आता संशय, आरोप आणि आंतरिक ‘फिक्सिंग’च्या चर्चांचे सावट गडद झाले आहे. मतदार यादीतील कथित घोळ, उमेदवारी अर्जांमध्ये हस्तक्षेप, निवडणूक अधिकार्‍यांची संशयास्पद भूमिका आणि निवडक उमेदवारांना मिळणारे कथित संरक्षण यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षताच संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे.
फार्मासिस्ट प्रसाद वाघमोडे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे लेखी तक्रार दाखल करत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. अंतिम प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तीचे नाव अचानक समाविष्ट करून त्याचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सदस्यत्व मंजुरी, फी नोंद, कार्यकारिणीचा ठराव आणि अधिकृत दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक असताना, संबंधित प्रकरणात अशी कोणतीही वैध कागदपत्रे उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी बीड येथील असल्याने त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती नसून उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार सुरू आहे, असा थेट आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याहून गंभीर बाब म्हणजे निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले इतर सहा अधिकारी हे नांदेडमधीलच असून ते स्वतः संघटनेचे सदस्य असल्याची चर्चा आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसह कुटुंबीयच निवडणूक रिंगणात असल्याने हितसंबंधांचा उघड संघर्ष निर्माण झाल्याचा आरोप सदस्यांमधून होत आहे. काही विशिष्ट उमेदवारांचे अर्ज ‘वाचवण्यासाठी’ निवडणूक अधिकार्‍यांकडून त्रुटी दुरुस्त करून घेतल्याचेही बोलले जात आहे. तर विद्यमान गटांसाठी धोकादायक ठरणार्‍या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यासाठी दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप पुढे आला आहे. काही उमेदवारांच्या सूचक आणि अनुमोदकांवरही दबाव आणल्याच्या चर्चा संघटनेत जोर धरू लागल्या आहेत. मागील दोन निवडणुका केवळ औपचारिकता ठरल्या असून, दोन्ही गटांतील मातब्बरांना ‘समन्वयाने’ निवडून आणण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. यंदा दोन पॅनल समोरासमोर असल्याचे चित्र निर्माण केले जात असले, तरी आतून ‘क्लबिंग’ सुरू असल्याची जोरदार चर्चा केमिस्ट वर्तुळात रंगू लागली आहे. नांदेड शहरात साडेचार हजारांहून अधिक नोंदणीकृत फार्मासिस्ट असताना केवळ 1 हजार 800 सदस्यांची मतदार यादी जाहीर करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे या यादीतील सुमारे साडेचारशे औषध दुकाने बंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. अस्तित्वात नसलेल्या दुकानांची नावे कायम ठेवली जात असताना, प्रत्यक्ष व्यवसाय करणार्‍या अनेक फार्मासिस्टांची नावे यादीतून गायब असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पूर्वी निवडणुकीच्या जाहिराती प्रमुख वर्तमानपत्रांत ठळकपणे प्रसिद्ध होत असत. मात्र यावेळी अत्यंत किरकोळ जाहिरात देऊन संपूर्ण प्रक्रिया गुपचूप उरकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सदस्यांकडून केला जात आहे. अनेक सदस्यांना निवडणुकीची माहितीच मिळाली नसल्याने प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया तातडीने पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने राबवावी, अन्यथा हे प्रकरण सहकार विभाग, धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि न्यायालयात नेण्यात येईल, असा इशारा प्रसाद वाघमोडे यांनी दिला आहे. संघटनेच्या निवडणुकीभोवती निर्माण झालेल्या या वादामुळे आता केमिस्ट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS