बीड : नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प हे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न असून, या प्रकल्पामुळे या भागाच्या आर्थिक, औद्योगिक आणि

बीड : नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्प हे बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचे स्वप्न असून, या प्रकल्पामुळे या भागाच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. येत्या मराठवाडा मुक्ती दिनापर्यंत (17 सप्टेंबर 2026) प्रकल्पाचा पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने समन्वयाने काम करावे. राज्य शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच स्थानिक अडथळे दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊन कामांना गती द्यावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या.
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित नगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी, खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार विजयसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, दिवंगत अजितदादा पवार यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करून नगर-बीड रेल्वे प्रकल्पाला गती दिली. हा प्रकल्प पूर्ण करणे हे त्यांच्या विकासदृष्टीचे स्वप्न असून, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या रेल्वेमार्गामुळे बीड जिल्ह्याला राज्याच्या मुख्य रेल्वे जाळ्याशी प्रभावीपणे जोडले जाईल आणि उद्योग, व्यापार, शेती, शिक्षण तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. त्या पुढे म्हणाल्या की, प्रकल्पाच्या कामात कोणताही अडथळा येऊ देऊ नये. जमीन संपादन, स्थानिक प्रश्न किंवा प्रशासकीय बाबी तातडीने निकाली काढून कामांना गती द्यावी. रेल्वे प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी परस्पर समन्वयातून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

COMMENTS