‘आप’ची वाटचाल

Homeताज्या बातम्यासंपादकीय

‘आप’ची वाटचाल

गेल्या अनेक वर्षांपासून विजनवासात गेलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अचानकपणे जागे होत, आम आदमी पक्षाच्या मद्य धोरणांवर टीका करत, अरविंद केज

पवारांचे सोयीचे राजकारण …
कर्नाटक भाजपमधील बंडाळी
अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस  

गेल्या अनेक वर्षांपासून विजनवासात गेलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अचानकपणे जागे होत, आम आदमी पक्षाच्या मद्य धोरणांवर टीका करत, अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढल्याचे म्हटले होते. त्यानंतर दिल्लीत भाजप ऑपरेशन लोटस राबवित असल्याच्या चर्चा उठविल्या गेल्या. त्यानंतर आपने विश्‍वासदर्शक ठराव बहुमताने जिंकत विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे. यात चर्चा होतांना दिसून येते ती, आपची. देशात सक्षम विरोधक नसतांना, आप तो पर्याय उभा करू पाहत आहे. मात्र केजरीवाल इतर प्रादेशिक पक्षांसोबत मोट न बांधता आपले एकला चलो रे चे धोरण अवलंबत विविध राज्यात दिमाखात प्रवेश करतांना दिसून येत आहे. दिल्लीनंतर पंजाबमध्ये मातब्बर पक्षांना धूळ चारत पंजाबमध्ये आपचा मुख्यमंत्री विराजमान झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आपने आपला मोर्चा गुजरात आणि हिमाचलप्रदेश या राज्यांकडे वळविला आहे. गुजरातमध्ये आप चांगली मुसंडी घेईल, असा राजकीय अंदाज निवडणुकीपूर्वीच विविध संस्थांची वर्तवलेल्या अंदाजाद्वारे स्पष्ट केले आहे. गुजरात राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होमग्राऊंड. भाजपचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे मनसुभे आपने रचल्याचे दिसून येत आहे. त्यामुहे भाजप सहजा-सहजी आपचे मनसुभे पूर्ण होऊ देणार नाही. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला फेस आणला होता. राज्यातील विधानसभेच्या 182 पैकी भाजपला 99 जागाच जिंकता आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात उतरून भाजपला राज्य जिंकून दिले होते. मात्र यावेळेस काँगे्रस गलितगात्र झाली आहे. काँगे्रसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. शिवाय काँगे्रसचा पटेल समुदायाचा चेहरा हार्दिक पटेलने भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे यावेळेस गुजरातची निवडणूक ही आप आणि भाजपमध्ये रंगण्याची शक्यता जास्त आहे. मुळातच सक्षम लोकशाहीसाठी विरोधक हा घटक महत्वाचा ठरतो. खरं तर ही भूमिका विरोधकांनी मोठया सक्षमपणे पेलण्याची गरज आहे. मात्र विरोधक विविध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकल्यामुळे त्याचा आवाज क्षीण झाला आहे. त्यामुळे निकोप चारित्र्याचे, नैतिकता असणारे विरोधक आता उरलेले दिसून येत नाही. त्यातच आपने दिल्लीत, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सोयी-सुविधामध्ये घेतलेली झेप आश्‍चर्यचकित करणारी आहे. त्यामुळे एकंदरित आपने आपली पावले सावकाश टाकण्यास सुरूवात केली आहे. आप सध्या पंजाब आणि दिल्ली अशा दोन राज्यात सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे सक्षम विरोधक म्हणून आप पुढे येतांना दिसून येत आहे. भाजपवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक असे राष्ट्रीय विरोधी पक्षाचे स्थान प्राप्त करण्यास आप सक्षम आहे अशी एक सामान्य धारणा रुजत चालली आहे. हे स्थापन प्राप्त करण्यासाठी काँग्रेस गेल्या काही वर्षांपासून झगडत आहे. यात विशेष बाब म्हणजे आपने आतापर्यंत कोणत्याही समविचारी पक्षासोबत हातमिळवणी केली नाही. त्यामुळे स्वतंत्र आणि एकला चलो रे ची भूमिका आपले राजकीय प्रस्थ वाढवण्यास सुरूवात केली आहे. अण्णा हजारे यांनी आपवर हल्ला चढवत केजरीवाल यांना सुनावले असले तरी, सोशल मीडियवर अनेकांनी अण्णा हजारे यांच्या या पत्राला ट्रोल केले आहे. अण्णांची भूमिकाच संशयास्पद असून, अण्णांना देशातील इतर बाबी दिसत नाही का, असा या ट्रोलचा रोख होता. आणि तो खरांही आहे. देशात इतके सामाजिक, घटनात्मक प्रश्‍न निर्माण झाले असतांना अण्णांनी कधी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र आप पक्षाच्या ध्येय धोरणांवर अण्णांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. मात्र इतर पक्षांवर, विशेषत भाजपच्या सत्ताधार्‍यांवर अण्णांनी थेट टीका करण्याचे टाळले आहे, हे विशेष.

COMMENTS