शिरूर कासार: तालुक्यातील पाडळी येथील भिल्ल वस्तीमध्ये घडलेल्या दुर्दैवी खून प्रकरणानंतर परिसरात अनेक सामाजिक व शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या होत

शिरूर कासार: तालुक्यातील पाडळी येथील भिल्ल वस्तीमध्ये घडलेल्या दुर्दैवी खून प्रकरणानंतर परिसरात अनेक सामाजिक व शैक्षणिक समस्या निर्माण झाल्या होत्या. विशेषतः आदिवासी भिल्ल समाजातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता. या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी बीड, तहसीलदार शिरूर कासार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊन समस्या मांडण्यात आली, मात्र अपेक्षित तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
अशा कठीण परिस्थितीत एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या संस्थापिका सौ. सुमित्राताई दशरथ पवार आणि अॅड. सूर्यकांत दशरथ पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोठा पुढाकार घेतला. त्यांनी पाडळी भिल्ल वस्तीतील सुमारे १८ ते २० मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत त्यांना दत्तक स्वरूपात शैक्षणिक आधार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या सर्व मुलांच्या राहण्याची, जेवणाची आणि शिक्षणाची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून त्यांना राजमाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित केंद्रीय आदिवासी निवासी आश्रम शाळा, मराठवाडी (ता. आष्टी, जि. बीड) येथे दाखल करण्यात आले आहे.
शाळेचे मुख्याध्यापक सुभाष कोहक आणि शिक्षक विशाल मराठी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या निवास, संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही शाळा प्रशासनाने दिली आहे. शिक्षणापासून वंचित राहण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या या मुलांना या उपक्रमामुळे नवजीवन आणि उज्ज्वल भविष्याची संधी मिळाली आहे. एकलव्य भिल्ल समाज संघटनेने उचललेले हे पाऊल सामाजिक कार्याचा एक मोठा आदर्श मानले जात असून, या निर्णयामुळे आदिवासी भिल्ल समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS