Homeताज्या बातम्या

वयाच्या पंचाहत्तरीतही ‘हरित तपस्या’! सातारा डोंगराच्या कुशीत बीज पेरणारा सेवानिवृत्त शिक्षक; पर्यावरणासाठी अविरत साधना

अकोले: निवृत्तीनंतर अनेक जण आयुष्याच्या संध्याकाळी विश्रांतीचा मार्ग स्वीकारतात. पण काही माणसे अशी असतात, ज्यांच्या आयुष्याला निवृत्ती नसते; उलट

खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर शिवीगाळ; सत्तेत जाताच वाढली मुजोरी, राज्यभरातून तीव्र संताप
लाडकी बहीण योजनेत १२ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; अपात्र लाभार्थ्यांकडून १६५ कोटींच्या वसुलीची तयारी
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ

अकोले: निवृत्तीनंतर अनेक जण आयुष्याच्या संध्याकाळी विश्रांतीचा मार्ग स्वीकारतात. पण काही माणसे अशी असतात, ज्यांच्या आयुष्याला निवृत्ती नसते; उलट समाजासाठी काहीतरी करून जाण्याची धडपडच त्यांच्या जगण्याचा श्वास बनते. अकोलेतील मॉडर्न हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक मधुकरराव बिबवे हे त्यापैकीच एक आहेत. वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांच्या हातात काठी नसून झाडांच्या बिया आहेत आणि त्यांच्या पावलांचा रस्ता विश्रांतीकडे नसून हिरवाईकडे वळलेला आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मधुकरराव बिबवे यांनी तब्बल ३५ वर्षे मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. वर्गखोलीत विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास केल्यानंतर, आता निवृत्तीनंतर निसर्गाच्या वर्गात त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा धडा स्वतःच्या कृतीतून शिकवण्याचा संकल्प केला आहे. ते अकोले शहरालगतच्या सातारा डोंगराच्या पायथ्याशी दररोज पोहोचतात. पावसाळ्यात ओलसर जागा शोधत ते शेकडो बिया मातीत विसावत असून, प्रत्येक बीजामध्ये त्यांना भविष्यातील विशाल वृक्ष दिसत आहे.

उपमुख्याध्यापक सुधीर जोशी यांची मोलाची साथ

या कौतुकास्पद उपक्रमात त्यांना त्यांचे जुने सहकारी आणि मॉडर्न हायस्कूलचे उपमुख्याध्यापक सुधीर जोशी यांची मोलाची साथ लाभत आहे. दोघांनी मिळून सातारा डोंगराच्या परिसरात शेकडो वृक्षबिया पेरण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, फक्त निसर्गावरील निस्सीम प्रेम आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी या भावनेतून हे कार्य अविरत सुरू आहे.

आपल्या या कार्याबद्दल बोलताना मधुकरराव बिबवे अतिशय साधेपणाने म्हणतात, “यातील काही बिया जरी रुजल्या आणि त्यांचे वृक्ष झाले, तरी आपल्या श्रमाचे चीज झाल्याचे समाधान मिळेल.” त्यांच्या या निःस्वार्थी दृष्टिकोनाचे आणि हरित तपस्येचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भविष्यात मॉडर्न हायस्कूलचे विद्यार्थीही या हरित मोहिमेत सहभागी होऊन सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करतील, असा विश्वास उपमुख्याध्यापक सुधीर जोशी यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS