माहूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावर रविवारी अक्षयतृतीयेचा सण मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्या

माहूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर गडावर रविवारी अक्षयतृतीयेचा सण मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त श्री रेणुकामातेची विधिवत पूजा करून देवीला रसाळ आंब्यांची आकर्षक ‘आम्रफळ’ आरास अर्पण करण्यात आली. या देखण्या दर्शनासाठी भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती.
दि. 19 एप्रिल रोजी सकाळी शुभमुहूर्तावर श्री रेणुकामातेचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर विधिवत पूजाविधी पार पडला. अक्षयतृतीयेचे औचित्य साधून माहूर संस्थानतर्फे देवीला सुवर्णालंकारांनी सजवून ‘अलंकार महापूजा’ करण्यात आली. उन्हाळ्याचा ऋतू आणि आंब्यांचा हंगाम लक्षात घेऊन गाभार्यात शेकडो आंब्यांची कलात्मक मांडणी करण्यात आली होती. देवीचे हे ‘आम्ररूप’ पाहून भाविक भारावून गेले. अक्षयतृतीयेच्या विशेष महत्त्वामुळे नांदेड जिल्ह्यासह मराठवाडा, यवतमाळ, वाशिम तसेच तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि विदर्भातील विविध भागांतून हजारो भाविकांनी पहाटेपासूनच माहूर गड गाठला. ‘आई राजा उदे उदे’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतले आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली. उन्हातही भाविकांची मोठी गर्दी उन्हाचा वाढता कडाका लक्षात घेता माहूर देवस्थान समितीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच सावलीची विशेष व्यवस्था केली होती. गर्दीमुळे कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. माहूर गडावरील ही आम्रफळांची आरास भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली असून अक्षयतृतीयेचा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

COMMENTS