Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतंजली आणि पत गेली!

रिचर्ड कॅटबरोची उपस्थिती भारतासाठी अपशकुनी ठरतेय 
कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करावी ः प्रा. बाबा खरात
समस्या किंवा कठीण काळ येतो तेव्हा, तो चारही बाजूंनी येतो; अशी एक पारंपरिक म्हण आहे. या म्हणीच्या अर्थानुसार जेव्हा एखादं संकट येतं, तर ते एकट्याने येत नाही, तर, संकटांची मालिका चारही बाजूंनी घेरते, अशा प्रकारचा अर्थ यातून ध्वनीत होतो. हा उल्लेख करण्यामागचं कारण, गेल्या काही वर्षांपासून, भारतामध्ये सातत्याने अमुक एक आजार यासाठी रामबाण औषध म्हणून, आम्ही निर्माण केलेले औषध वापरा, अशा जाहिराती करून ते उत्पादन मोठ्या प्रमाणात विक्रीस ठेवणाऱ्या पतंजली उद्योगाला सर्वोच्च न्यायालयाने मोठी चपराक लगावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने इंडियन मेडिकल कौन्सिलच्या याचिकेवर निर्णय करताना पतंजलीने केलेले दावे आणि जाहिराती तात्काळ मागे घ्याव्यात, अन्यथा, पतंजलीच्या सर्व उत्पादनांवर एक-एक कोटी रुपयाचे दंड ठोठावण्यात येतील, असा सक्त इशारा दिला होता. या विरोधात रामदेव बाबा यांनी ताबडतोब पत्रकार परिषद घेऊन, आम्ही कोणत्याही जाहिराती चुकीच्या करत नसून, आमच्या विरोधात षडयंत्र केलं गेल्याचं त्यांचं म्हणणं त्यांनी मांडले होते. हे एकप्रकारे न्यायपालिकेला आव्हान होते. धार्मिक क्षेत्रात नेतृत्व करणारे रामदेव बाबा, हे बाबा असण्यापेक्षा, उद्योजक अधिक आहेत. दहा हजार कोटींचा उद्योग पाहता पाहता त्यांनी नावारूपाला आणला. भारतीय बाजारपेठेत त्यांनी आपला एक वेगळा करिष्मा निर्माण केला. परंतु, या पाठीमागे निश्चितपणे सरकारी यंत्रणांचाही त्यांना आशीर्वाद राहिला. मात्र, सर्वसामान्य भारतीय ग्राहक हा सर्वात आधी श्रद्धावान असतो. त्यामुळे त्याच्यात असलेल्या श्रद्धेला आव्हान करून, आपले बाजारपेठी उत्पादित माल हा कसा अचूक उपाय असणारा आहे, याची जाहिरात रामदेव बाबा यांनी अनेक टीव्ही चॅनेल्स, वर्तमानपत्र, सोशल मीडिया अशा वेगवेगळ्या माध्यमातून करून भारतीय ग्राहकांना आपलेसे करून घेतले. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निर्णयामध्ये पतंजलीचे सर्वेसर्वा असणारे रामदेव बाबा यांना मुळात राग येऊ नये, किंवा त्या विरोधात त्यांनी पत्रकार परिषद घ्यायला नको होती; पण, ऐकतील ते बाबा कसे? कारण त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनाविरोधात जर याचिका होती, तर त्या विरोधात मांडलेल्या मुद्द्यांना पराभूत करणारे मुद्दे आणि त्यासाठी लागणारी आवश्यक वैज्ञानिक संशोधन पद्धती आणि त्यासाठी लागणारे पुरावे, हे त्यांनी न्यायालयात सादर करायला हवे होते. त्या संदर्भात पुरावे सादर करण्यात त्यांना आलेले अपयश हे त्यांच्या विरोधात निर्णय देण्यापर्यंत गेले आहे. औषधीय शास्त्रामध्ये किंवा वैद्यकीय शास्त्रामध्ये कोणतेही औषध निर्माण करायचे असेल आणि ते मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेत आणायचे असेल तर, त्याचे प्राण्यांवर आणि त्यानंतर वेगवेगळ्या सजीवांवर केलेले प्रयोग आणि मग चाचणी दाखल मानवी जीवनावर केलेले प्रयोग, याचे दाखले द्यावे लागतात. त्यानंतरच कोणतेही औषध किंवा डोस हा प्रत्यक्षात बाजारात येतो. परंतु, अशा प्रकारची कोणतीही पथ्ये पतंजलीने पाळली नाही. त्यामुळे इंडियन मेडिकल कौन्सिल हे न्यायालयात गेले. अर्थात हा वाद कोरोना काळापासूनच आहे. कोरोनाच्या काळात रामदेव बाबा यांनी पतंजलीच्या माध्यमातून अनेक औषधांची निर्मिती करून ते बाजारपेठेत आणले. मानवी जीवन अतिशय संवेदनशील असते. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर ते संवेदनशील असते. एखाद्या चुकीच्या औषधाचा डोस मानवी जीवनावर कायमचे गंभीर परिणाम करणारे असू शकते. ऍलोपॅथी सारख्या रासायनिक औषधे निर्माण करणाऱ्या क्षेत्रात साईड इफेक्ट अधिक असूनही ती औषधे जास्तीत जास्त सुरक्षित करण्याचा प्रयत्न जगभरात केला जातो. पतंजली सारख्या औषध क्षेत्रात उत्पादनाचा दावा करणाऱ्या कंपनीने औषध निर्मितीचे आंतरराष्ट्रीय किंवा वैज्ञानिक संकेत पाळायलाच हवेत! भारतात आता सर्वच औषधांप्रमाणे आयुर्वेदिक औषधांचेही लाॅबिंग सुरू झाले आहे काय, याचाही उलगडा होणे गरजेचे आहे.

COMMENTS