कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळात धर्मादाय उपआयुक्तांच्या आदेशाचा गैरअर्थ लावून वैधानिक अधिकार नसत

कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळात धर्मादाय उपआयुक्तांच्या आदेशाचा गैरअर्थ लावून वैधानिक अधिकार नसताना धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत संस्थेवर स्वतंत्र प्रशासक नेमावा, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ तलवारे यांनी धर्मादाय उपआयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तलवारे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संस्थेच्या बदल अहवालात (चेंज रिपोर्ट) गंभीर त्रुटी आढळल्याने धर्मादाय उपआयुक्तांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी तो नामंजूर केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि केवळ दैनंदिन कामकाज सुरू राहावे, या उद्देशाने 10 जुलै 2026 रोजी धर्मादाय उपआयुक्त ममता राखडे यांनी जुन्या विश्वस्तांना कोणतेही धोरणात्मक किंवा दीर्घकालीन निर्णय न घेण्याच्या अटीवर मर्यादित परवानगी दिली होती.
मात्र, या आदेशाचा विपर्यास करून संस्थेतील सुभाष गायकवाड यांनी स्वतःची सचिवपदी निवड झाल्याचा आभास निर्माण करणार्या बातम्या प्रसिद्धीस दिल्याचा आरोप तलवारे यांनी केला आहे. तसेच, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विभागीय सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय आणि इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयांशी स्वतःला सचिव म्हणून पत्रव्यवहार केल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धर्मादाय उपआयुक्तांच्या आदेशाच्या मर्यादेचे उल्लंघन करून घेतलेले सर्व धोरणात्मक निर्णय आणि प्रस्ताव रद्द करण्यात यावेत, तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संस्थेवर स्वतंत्र प्रशासक नियुक्त करावा, अशी मागणी तलवारे यांनी केली आहे. वैधानिक मान्यता नसलेल्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयांचीही चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

COMMENTS