महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशभरात अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. खरंतर भारतासारख्या देशात तरूणांची आणि मध्यमवर्गीय ल
महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशभरात अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. खरंतर भारतासारख्या देशात तरूणांची आणि मध्यमवर्गीय लोकांची संख्या सर्वाधिक. त्यामुळे बाजारपेठ म्हणून देखील या देशाकडे बघितले जाते. मात्र त्याचबरोबर एखाद्या राष्ट्राला पराभूत करण्यासाठी नेहमीच रणांगणावर युद्ध करावे लागते असे नाही. समाजाच्या भवितव्यावर घाला घालायचा असेल, तर त्याच्या तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात अडकविणे पुरेसे ठरते. त्यामुळे अमली पदार्थांचा वापर आणि वावर वाढतांना दिसून येत आहे. मुंबईत कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी’ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाला सुरूवात केली. पुढे बोलतांना ही चळवळ बनावी अस आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे, आणि ती काळाजी गरज आहे.’ड्रग्ज फ्री मुंबई’च्या पुढे जात ’ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ हे व्यापक लोकचळवळीचे ध्येय बनविण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र ही देशातील सर्वाधिक औद्योगिक, शैक्षणिक आणि नागरीकरण झालेली राज्यांपैकी एक आहे. रोजगार, शिक्षण आणि करिअरच्या संधींच्या शोधात लाखो विद्यार्थी पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर यांसारख्या शहरांत दाखल होतात. विशेषतः पुणे हे देशाचे ’विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाते. हजारो महाविद्यालये, विद्यापीठे, तंत्रशिक्षण संस्था आणि देश-विदेशातून येणारे विद्यार्थी यामुळे पुणे सतत गजबजलेले असते. मात्र, या विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच अमली पदार्थांची विक्री, पुरवठा आणि सेवनाचे प्रमाण वाढत असल्याच्या घटना चिंताजनक आहेत. अनेक तरुण सुरुवातीला केवळ कुतूहल, मित्रांचा दबाव, आधुनिक जीवनशैलीचे आकर्षण किंवा मानसिक ताण कमी करण्याच्या नावाखाली व्यसनाच्या संपर्कात येतात. काही जणांना हे केवळ करमणुकीचे साधन वाटते; परंतु काही दिवसांतच ते त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे व्यसन ठरते. एकदा व्यसनाधीनता निर्माण झाली की शिक्षण, कुटुंब, आरोग्य, नोकरी, आर्थिक स्थिती आणि मानसिक संतुलन यांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. अनेक विद्यार्थी गुन्हेगारीकडे वळतात, काही नैराश्यात जातात, तर काहींचे आयुष्य अकाली संपते. त्यामुळे अमली पदार्थांचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण समाजाच्या भविष्याशी जोडलेला आहे.
पुण्यासारख्या शैक्षणिक शहरांमध्ये विविध राज्यांतील तसेच परदेशातील विद्यार्थी वास्तव्यास असतात. वसतिगृहे, भाड्याच्या निवासव्यवस्था, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे कार्यक्रम, सामाजिक माध्यमांद्वारे वाढलेले संपर्क आणि गुप्त पद्धतीने कार्यरत असलेली अमली पदार्थांची टोळी यामुळे या शहरांना लक्ष्य केले जात आहे. ही परिस्थिती वेळेत रोखली नाही, तर महाराष्ट्राच्या ज्ञानपरंपरेलाच मोठा धोका निर्माण होईल. अमली पदार्थांच्या अवैध व्यापारामागे केवळ काही गुन्हेगार नसतात. त्यामागे मोठे आर्थिक जाळे, संघटित टोळ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील साखळी कार्यरत असते. तरुणाई हेच त्यांचे सर्वात मोठे लक्ष्य असते. देशाची उत्पादनक्षमता, सामाजिक स्थैर्य आणि भावी नेतृत्व कमकुवत करण्यासाठी अमली पदार्थांचे जाळे विस्तारले जाते. त्यामुळे या संकटाकडे केवळ पोलीस कारवाईच्या चौकटीत पाहून चालणार नाही. ही समाजव्यापी लढाई आहे.
आज महाराष्ट्रात अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त होतात. विविध शहरांमध्ये कारवाया होतात. तरीदेखील हा व्यापार पूर्णपणे थांबत नाही. याचे कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजूंवर एकाच वेळी प्रहार होत नाही. ज्या ठिकाणी मागणी निर्माण होते, तेथे पुरवठा आपोआप पोहोचतो. म्हणूनच व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी कठोर अंमलबजावणीबरोबर जनजागृतीची व्यापक चळवळ उभी करावी लागेल. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका पालकांची आहे. मुलांच्या वागण्यात अचानक होणारे बदल, अभ्यासापासून दुरावा, अनावश्यक खर्च, चिडचिड, एकटेपणा, संशयास्पद मित्रपरिवार किंवा सतत घराबाहेर राहण्याची सवय यांकडे दुर्लक्ष करता कामा नये. अनेक वेळा पालकांना सत्य समजते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. संवाद तुटल्यावर व्यसनाला खतपाणी मिळते. त्यामुळे घरात विश्वासाचे वातावरण आणि सातत्यपूर्ण संवाद हीच पहिली प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. शाळा आणि महाविद्यालयांची जबाबदारीही तितकीच मोठी आहे. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देणे पुरेसे नाही, तर जीवनमूल्ये, मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याबाबत नियमित मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. प्रत्येक महाविद्यालयात समुपदेशन केंद्र, तक्रार नोंदविण्याची गोपनीय व्यवस्था आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणा असली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल ओळखण्याचे प्रशिक्षणही घेणे गरजेचे आहे. समाजमाध्यमे आणि मनोरंजनाच्या काही माध्यमांतून व्यसनाला आधुनिकतेचे, स्वातंत्र्याचे किंवा प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून दाखविण्याची प्रवृत्तीही धोकादायक आहे. युवकांमध्ये निर्माण होणार्या या चुकीच्या समजुती मोडून काढण्यासाठी प्रभावी जनजागृती आवश्यक आहे. खेळ, कला, साहित्य, स्वयंसेवा आणि सामाजिक उपक्रम यांकडे तरुणांना वळविणे हीदेखील व्यसनमुक्तीची प्रभावी दिशा ठरू शकते. सरकारने कठोर कायदे, सातत्यपूर्ण धाडी, अमली पदार्थांचा पुरवठा करणार्या साखळीचा शोध, आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण आणि दोषींना जलद शिक्षा या बाबींवर अधिक भर द्यायला हवा. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विशेष दक्षता पथके, नियमित तपासणी आणि नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. व्यसनाधीन तरुणांना गुन्हेगार म्हणून नव्हे, तर उपचाराची गरज असलेले नागरिक म्हणून पुनर्वसनाची संधी देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या, गुणवत्ता आणि उपलब्धता वाढविणे हीदेखील काळाची गरज आहे. महाराष्ट्राने अनेक सामाजिक चळवळी यशस्वी केल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, जलसंवर्धन, साक्षरता, स्वच्छता आणि लोकसहभागाच्या अनेक उपक्रमांनी समाजपरिवर्तन घडवून आणले. त्याच धर्तीवर ’ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ ही राज्यव्यापी लोकचळवळ उभी राहिली, तर तिचे दूरगामी परिणाम दिसतील. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येक शाळा, प्रत्येक महाविद्यालय आणि प्रत्येक कुटुंब या अभियानाचा भाग झाले, तर अमली पदार्थांच्या जाळ्याला मोठा धक्का देता येईल. आज प्रश्न केवळ एका शहराचा किंवा काही विद्यार्थ्यांचा नाही. प्रश्न महाराष्ट्राच्या भावी पिढीचा आहे. ज्ञान, विज्ञान, उद्योग, संशोधन आणि संस्कार यांच्या बळावर प्रगती करणार्या महाराष्ट्राची ओळख व्यसनाधीन समाज अशी होऊ देता कामा नये. तरुणाई ही राज्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. तिचे संरक्षण करणे हे सरकार, पोलीस, शिक्षणसंस्था, पालक, प्रसारमाध्यमे आणि प्रत्येक सजग नागरिक यांचे समान कर्तव्य आहे. ’ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ हा केवळ घोषवाक्य राहू नये; तो प्रत्येक नागरिकाचा संकल्प बनला पाहिजे. कारण व्यसनमुक्त तरुणाई म्हणजे सक्षम कुटुंब, सक्षम समाज आणि समर्थ राष्ट्र. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी हीच आजची सर्वात मोठी गरज आणि काळाची हाक आहे.


COMMENTS