नांदेड: शहरात ’महाराष्ट्र शासन’, ’सेंट्रल गव्हर्नमेंट’, ’भारत सरकार’ अशा पाट्या लावून फिरणार्या चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय वाढल्याचे चित्र

नांदेड: शहरात ’महाराष्ट्र शासन’, ’सेंट्रल गव्हर्नमेंट’, ’भारत सरकार’ अशा पाट्या लावून फिरणार्या चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे अशांपैकी काही वाहने विविध सरकारी अधिकार्यांच्या निवासस्थानांच्या परिसरात नियमितपणे उभी असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येत असून, या वाहनांचा प्रत्यक्ष वापर अधिकृत शासकीय कामासाठी होतो की वैयक्तिक कारणांसाठी, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शासनाच्या नावाच्या पाट्या लावलेल्या वाहनांना अनेक ठिकाणी सहज प्रवेश मिळतो. काहीवेळा वाहतूक तपासणीदरम्यानही अशा वाहनांकडे तुलनेने वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. त्यामुळे शासनाच्या नावाचा वापर करून नियमांना बगल दिली जात नाही ना, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. काही वाहने संबंधित अधिकारी किंवा विभागाच्या अधिकृत वापरातील आहेत, तर काही वाहने करार पद्धतीवरील अथवा वैयक्तिक मालकीची असूनही त्यांच्यावर शासनाच्या पाट्या दिसून येतात.
अशा परिस्थितीत कोणत्या वाहनांना शासनाची अधिकृत ओळख दर्शविण्याचा अधिकार आहे आणि कोणती वाहने नियमांचे उल्लंघन करीत आहेत, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. प्रशासनाने अशा वाहनांची विशेष मोहीम राबवून तपासणी करावी, वाहनांच्या नोंदणीची, मालकीची आणि वापराच्या स्वरूपाची पडताळणी करावी, तसेच अनधिकृतपणे शासनाच्या नावाचा वापर करणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून शासनाच्या नावाचा गैरवापर होत असल्यास त्यावर कठोर कारवाई केल्यास अशा प्रकारांना आळा बसू शकतो. शासनाच्या नावाचा वापर हा केवळ प्रतिष्ठेचा विषय नसून सार्वजनिक विश्वासाशी निगडित असल्याने त्यामध्ये पारदर्शकता आणि नियमांचे काटेकोर पालन होणे तितकेच आवश्यक आहे.

COMMENTS