Homeताज्या बातम्या

किनवटमध्ये ३.२० कोटी रुपयांचा शासकीय निधी अपहार; वैद्यकीय अधीक्षक डॉ. विक्रम राठोड यांच्यावर गुन्हा दाखल

किनवट: नांदेड जिल्ह्यातील मांडवी (ता. किनवट) येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात शासकीय निधीचा ३,२०,९९,९५३ (तीन कोटी वीस लाख नव्वद हजार नऊशे त्

आयआयटी मुंबई येथे विद्यार्थ्याची आत्महत्या; वसतिगृहातील खोलीत घेतला गळफास
उद्धव ठाकरेंना कल्याण न्यायालयाचे समन्स; ५ ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश, एकनाथ शिंदेंनाही समन्स जारी
राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत बीडच्या मुलींना रौप्यपदक; शासनाच्या ५% क्रीडा आरक्षणाचा मिळणार लाभ

किनवट: नांदेड जिल्ह्यातील मांडवी (ता. किनवट) येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात शासकीय निधीचा ३,२०,९९,९५३ (तीन कोटी वीस लाख नव्वद हजार नऊशे त्रेपन्न रुपये) रुपयांचा मोठा अपहार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक तथा आहरण व संवितरण अधिकारी डॉ. विक्रम दासराव राठोड यांच्याविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर फिर्याद नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय माणिकराव पेरके (वय ४१ वर्ष) यांनी २८ जुलै रोजी मांडवी पोलीस ठाण्यात दिली आहे. उपसंचालक आरोग्य सेवा, लातूर मंडळ यांच्या आदेशानुसार डॉ. पेरके यांना या प्रकरणी कायदेशीर कारवाई व एफआयआर दाखल करण्याचे अधिकृत प्राधिकार देण्यात आले होते.

फिर्यादीनुसार, मांडवी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद वर्ग-१ दर्जाचे आहे. तत्कालीन अधिकारी डॉ. एन. जी. लोकडे हे ५ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर, या पदाचा अतिरिक्त कार्यभार आणि आहरण व संवितरणाचे अधिकार ३१ मे २०२३ पासून डॉ. विक्रम दासराव राठोड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले होते. शासकीय कोषागारातून निधी आहारीत करणे आणि तो संबंधित कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी व इतर खर्चासाठी विहित पद्धतीने वितरित करणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी होती.

जिल्हा कोषागार अधिकारी, नांदेड यांनी १५ जुलै २०२६ रोजी दिलेल्या पत्रानुसार ही गंभीर बाब निदर्शनास आली. जुन्या ‘सेवाअर्थ’ प्रणालीतून नवीन ‘सेवाअर्थ’ प्रणालीत डेटा मायग्रेशनचे काम सुरू असताना, डॉ. विक्रम राठोड यांनी तांत्रिक बाबींचा गैरफायदा घेऊन चुकीच्या पद्धतीने वेतनाची नोंद केल्याचे दिसून आले. जून २०२४ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत बेसिक एरिअर्स थकबाकीच्या पोटी बनावट व चुकीची देयके तयार करण्यात आली.

किनवट उपकोषागार कार्यालयात ही बनावट देयके सादर करून डॉ. राठोड यांनी स्वतःच्या आणि इतर संबंधित खात्यांवर नियमबाह्यरीत्या निधी वळवून घेतला. लातूर येथील उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालयामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असता, डॉ. विक्रम दासराव राठोड यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गैरव्यवहार करून एकूण ३ कोटी २० लाख ९९ हजार ९५३ रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या फिर्यादीवरून मांडवी पोलिसांनी डॉ. राठोड यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. शासकीय तिजोरीवर मारलेल्या या डल्ला प्रकरणाने वैद्यकीय व शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

COMMENTS