Homeताज्या बातम्या

विदर्भात पावसाचा हाहाकार! यवतमाळात कुपटी नदीच्या पुरात कारसह ३ जण वाहून गेले; अमरावतीत ढगफुटीसदृश पाऊस

यवतमाळ/अमरावती: हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांतील विविध तालुक्य

श्रीदत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; २९ जुलै रोजी मुख्य सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
राहाता वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रकाश बेंद्रे; निवडणूक उत्साहात पारदर्शक वातावरणात संपन्न
इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत अगस्ती विद्यालयाचे उज्ज्वल यश; बहुसंख्य विद्यार्थी झाले पात्र
विदर्भात पावसाचा धुमाकूळ, नदी-नाल्यांना पूर; अमरावती, वर्धा जिल्ह्यातील  अनेक गावं संपर्काबाहेर Amravati Marathi News | Heavy rain everywhere in  Vidarbha; Hundreds of ...

यवतमाळ/अमरावती: हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वत्र मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक जिल्ह्यांतील विविध तालुक्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कुपटी नदीच्या पुरात कारसह कुटुंब वाहून गेले

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पुराच्या पाण्याचा अंदाज चुकल्याने पुलावरून जाणारी ईर्टिगा कार वाहून गेली. या दुर्घटनेत कारमधील अविनाश खंडारे हे झाडावर चढून राहिल्याने थोडक्यात बचावले. मात्र, त्यांची पत्नी माधवी खंडारे आणि प्राची व साची या दोन चिमुकल्या मुली रात्रीपासून बेपत्ता आहेत. लोणीकडे परतताना या कुटुंबावर हा प्रसंग बेतल्याने परिसर हादरला आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला तातडीने शोधमोहीम व मदतीचे आदेश दिले असून बचाव पथक शोध घेत आहे.

यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. वणी तालुक्यातील शिंदोला, कायर, रासा आणि झरी तालुक्यातील खडकडोह, झरी व मुकुटबन या ६ मंडळांमध्ये ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे.

अमरावतीत ढगफुटीसदृश पाऊस; १०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस कोसळल्याने धामक, धानोरा गुरव, मंगरूळ चव्हाळा, खेड पिंपरी, परसमंडळ, दिघी कोल्हे या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. धामक गाव चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेल्याने गावाला बेटाचे स्वरूप आले. नदीकाठच्या सुमारे १०० लोकांना रात्री उशिरा नांदगाव खंडेश्वर येथील मंगल कार्यालयात सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तसेच सातरगाव परिसरात मेंढी नाल्याच्या पुरात एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खबरदारी म्हणून या तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत.

इतर जिल्ह्यांतही अतिवृष्टी

गेल्या २४ तासांत गडचिरोली जिल्ह्यात २४० मि.मी., चंद्रपूरमध्ये २१० मि.मी. तर नागपूर जिल्ह्यातील उमरेड आणि हिंगणा तालुक्यात १०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने अमरावती व यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट तर चंद्रपूर, वर्धा, वाशीम आणि अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS